बेळगाव : जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. पार्किंग समस्येमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे वकील, पक्षकार यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार असा प्रकार होत आहे. त्यामुळे जेएमएफसी न्यायालयाच्या आवारातील परिसर स्वच्छ करून पार्किंगला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये भुयारी मार्गाशेजारी व कौटुंबिक न्यायालयासमोर मातीचे ढीग, इतर कचरा साचून होता. त्यामुळे त्या ठिकाणी वाहने पार्किंग करण्यास अडथळा निर्माण होत होता.
परिसर स्वच्छ केल्यानंतर पार्किंगला जागा उपलब्ध होऊ शकते, असे निदर्शनाला आल्यानंतर तातडीने त्या परिसरातील कचरा हटविण्यात येत आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारामध्ये विविध इमारतींचे काम करण्यात आले आहे. तर सध्या काही इमारतींचे काम सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी माती, दगड व इतर साहित्य पडून होते. काही ठिकाणी कचरादेखील टाकण्यात येत होता. झाडांच्या फांद्यादेखील तशाच पडून होत्या. त्यामुळे आता स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. सोमवारी या परिसरातील कचरा जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आला. त्यामुळे यापुढे नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.









