मडगाव नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिलेली माहिती : संबंधित खात्यांकडून गाळ्यांची यादी मागविणार
प्रतिनिधी / मडगाव
सार्वजनिक बांधकाम खात्याचे जुन्ता व अन्य निवासी गाळे, पोलीस गाळे, रेल्वे गाळे, वीज खात्याचे गाळे अशा सरकारी निवासी गाळ्यांना कचरा शुल्क लागू करण्याचे मडगाव पालिकेने ठरविले आहे. त्यासाठी संबंधित खात्यांशी पत्रव्यवहार करून त्यांच्या मडगाव पालिका क्षेत्रातील गाळ्यांची यादी मागविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली आहे.
सरकारने लागू केलेली कचरा शुल्क वाढीची 2020 ची अधिसूचना मार्गी लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून त्यानुसार घरमालकांना 600 रुपयांच्या जागी आता या आर्थिक वर्षापासून 900 ऊ. शुल्क भरावे लागणार आहे. ही वाढ 50 टक्के असल्याने काही नागरिकांकडून त्यास विरोध करण्यात आला आहे.
बुधवारी शॅडो कौन्सिल फॉर मडगावने या वाढीव कचरा शुल्काला हरकत घेतली होती व नगराध्यक्ष शिरोडकर यांना निवेदन सादर केले होते. यावेळी शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी वरील निवासी गाळे तसेच मोती डोंगर, आझादनगरी येथील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांकडून घरपट्टी तसेच कचरा शुल्क गोळा केले जात नसल्याकडे लक्ष वेधले होते. फक्त स्वत:हून पुढे येऊन करभरणा करणाऱ्यांवर ही वाढ का थोपविली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर मडगाव पालिकेने सरकारी निवासी गाळ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी पावले उचलताना संबंधित सरकारी खात्यांशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून पत्रव्यवहार करण्याचे निर्देश नगराध्यक्ष शिरोडकर यांनी लेखा आणि प्रशासकीय अधिकारी अभय राणे यांना दिले आहेत.









