ग्रा.पं.समोर कचरा टाकून केलेल्या आंदोलनाला अखेर यश
वार्ताहर /सांबरा
मुतगा ग्रामपंचायतीने अखेर कचरागाडी सुरू केल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मुतगा ग्रामपंचायतीचे कचरा उचल करण्याकडे मध्यंतरीच्या काळात दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱयाचे ढीग साचले होते. कचरागाडीही बंद असल्याने नागरिकांना कचरा टाकायचा कुठे, हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे खुली जागा दिसेल त्या ठिकाणी नागरिक कचरा टाकत होते. याबाबत अनेकवेळा ग्रा.पं.ला कळवूनही कचऱयाची उचल न केल्याने संतप्त नागरिकांनी चार दिवसांपूर्वी ग्रा.पं.समोरच कचरा टाकून आंदोलन छेडले होते. याची दखल घेत तातडीने ग्रा.पं.ने बंद असलेली कचरागाडी सुरू केली व नियमितपणे घरोघरी जाऊन कचऱयाचे संकलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रा. पं. सदस्य रवी कोटबागी, सदस्या मीरा देशपांडेंसह वायुदलातील अधिकारी जुनियर वॉरंट ऑफिसर मिथिलेश कुमार सिंग, सार्जंट इंद्रप्रकाश, सार्जंट के. एस. आनंदसह इतर अधिकाऱयांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती केली. ओला व सुका कचरा कुंडीतच टाकावा व खुल्या जागेत कचरा टाकू नये. परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन केले. यापुढे कचरागाडी नियमित कचरा गोळा करणार असून नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन पीडीओ कडेमनी यांनी केले.









