सायकल ट्रॅकवरच कचऱ्याचे ढीग : योजनेचा उडतोय बोजवारा : स्मार्ट सिटी केवळ कागदावरच
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करून विकास करण्यात आला आहे. सायकल ट्रॅक आणि फुलांच्या कुंड्या कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहेत. त्यामुळे योजनेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाबाबत शहरवासियांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धर्मनाथ भवन चौक ते श्रीनगरपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा सायकल ट्रॅकची सोय करून सुशोभिकरणासाठी फुलांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, यापैकी काही पुंड्यांमध्ये झाडेच लावण्यात आलेली नाहीत. लावण्यात आलेली काही झाडे वाळून गेली आहेत. काही झाडे जनावरांनी फस्त केली आहेत. त्यामुळे केवळ पुंड्याच राहिल्या आहेत. त्यामुळे या कुंड्यांचा वापर फुलझाडांऐवजी कचराकुंडी म्हणून केला जात आहे. त्यामुळे मनपाच्या सुशोभिकरणाचा उद्देश वाया गेला आहे. पावसाला सुरुवात झाली असली तरी मनपाकडून कुंड्यांमध्ये झाडे लावण्याची तसदी घेण्यात आली नाही. केवळ जागा अडविली जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. तसेच सायकल टॅक वाहनांच्या पार्किंगसाठी व कचरा टाकण्यासाठी केला जात असल्याने मनपाच्या स्मार्ट सिटी योजनेचा बोजवारा उडाल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. धर्मनाथ भवन चौक ते गँगवाडीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकावरच कचराकुंडी निर्माण करण्यात आली आहे. आसपासच्या नागरिकांकडून दुभाजकावर कचरा टाकला जात आहे. सुशोभिकरणासाठी झाडे लावण्यात आली असली तरी नागरिकांकडून मात्र दुभाजकांवर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे येथील वसाहतीमध्ये दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे.









