प्रतिनिधी /काणकोण
रविवारच्या सुट्टीचा फायदा उठवित काही अज्ञातांनी काणकोण पालिकेच्या जुन्या इमारतीजवळ उघडय़ावरच कचरा टाकला असून ज्या ठिकाणी या कचऱयाच्या पिशव्या टाकण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी ध्वजस्तंभ आहे. पालिकेकडून दरदिवशी या ठिकाणी ध्वजारोहण केले जाते.
रस्त्यावरच कचऱयाच्या पिशव्या टाकण्यात आल्यामुळे या ठिकाणी दुर्गधी पसरली आहे. पालिका दररोज घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असताना अशा प्रकारे विद्रुपीकरण कोणी तरी सूडबुद्धीनेच केले असावे, अशी चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. नवीन पालिका प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाला प्रारंभ झालेला असून संपूर्ण बांधकाम प्रकल्पाच्या सभोवती कुंपण घालण्यात आले आहे. त्यामुळे काही कचरावाहू वाहने पालिकेला रस्त्यावरच ठेवावी लागतात. मात्र सुट्टीचा फायदा उठवून ज्यांनी कोणी हा कचरा ध्वजस्तंभाजवळ टाकलेला आहे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.









