अव्वाच्या सव्वा भाड्यामुळे बोलीधारकांची पाठ : लवकरात लवकर वापरात आणण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी अंतर्गत रेल्वेस्थानकासमोरील कारवार बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. नूतनीकरण करताना बसस्थानकाच्या चौफेर दुकानगाळे उभे करण्यात आले. बसस्थानकाचे उद्घाटन होऊन दोन वर्षाहून अधिक कालावधी उलटला तरी अद्याप या दुकानगाळ्यांना बोलीधारक मिळत नसल्याने हे गाळे तसेच पडून आहेत. गाळ्यांचा वापर अवैध धंद्यांसाठी केला जात असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
कोकणातील राजापूर, कणकवली, कुडाळ, मालवण, देवगड, वेंगुर्ला, सावंतवाडी, गोव्यातील कदम्बा बस, तसेच रामनगर, कारवार, दांडेली बस बेळगावमधून कारवार बसस्थानकातून ये-जा करतात. याचबरोबर किणये, जानेवाडी, कर्ले, जांबोटी, कणकुंबी या भागात जाणाऱ्या बसदेखील येथूनच निघतात. पूर्वी या बसस्थानकामध्ये मोठी गर्दी व्हायची. परंतु, नूतनीकरणासाठी काही वर्षे बसस्थानक बंद करण्यात आल्याने बऱ्याच बससेवा मध्यवर्ती बसस्थानकातून सुरू करण्यात आल्याने प्रवाशांची संख्या कमी होत गेली.
स्मार्ट सिटी अंतर्गत कारवार बसस्थानकाला अत्याधुनिक रूप देण्यात आले. त्याचवेळी दुकानगाळ्यांचीही निर्मिती करण्यात आली. काही दुकानगाळे जुन्या गाळेधारकांना राखीव ठेवण्यात आले. तर उर्वरित दुकानगाळ्यांसाठी निविदा काढण्यात आल्या. परंतु, अव्वाच्या सव्वा लावण्यात आलेल्या भाड्यामुळे बोलीधारकांनी पाठ फिरविली. कॅन्टोन्मेंट बोर्डने दोन ते तीन वेळा निविदा काढून देखील बोलीधारकांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे हे दुकानगाळे तसेच पडून आहेत.
गर्दी कमी झाल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डने ठरविलेले भाडे घेण्यास कोणीच बोलीधारक तयार होत नाही. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डने कमी दरात हे दुकानगाळे भाडेतत्वावर द्यावेत, अशी मागणी होत आहे. गाळ्यांचे भाडे कमी केल्यास अनेकांना रोजगार मिळणार आहे. मागील दोन ते अडीच वर्षांपासून दुकानगाळे तसेच पडून असल्याने त्यांचा कोणताच वापर होत नसल्याचे समोर आले आहे.
दुकानगाळ्यांचा अवैध धंद्यांसाठी वापर
दुकानगाळे तयार करण्यात आले खरे. परंतु, यांचा वापर मात्र रात्रीच्या वेळी अवैध धंद्यांसाठी केला जात आहे. संध्याकाळी 8 नंतर या बसस्थानकात प्रवासी नसल्याने याचा फायदा घेत काही मद्यपी या ठिकाणी धुडगूस घालतात. दुकानगाळ्याचे दरवाजे मागील बाजूने तोडण्यात आले असून दुकानगाळ्यांमध्ये प्रवेश करत मद्यपींचा धुडगूस सुरू आहे. अनेकवेळा पोलिसांनी कारवाई करून देखील हे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळे बसस्थानक दिवसेंदिवस गलिच्छ होत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.









