प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी बस स्थानकावरील प्रवाशासाठी बांधलेल्या निवारा शेडमध्ये, प्लास्टिक बाटल्या व इतर कचऱ्याचे साम्राज मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे प्रवासी वर्ग व नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जांबोटी बस स्थानकावर प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी ग्राम पंचायतीतर्फे निवारा शेड बांधण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्dयात महिला प्रवासी व विद्यार्थी वर्गांची चांगली सोय झाली आहे. जांबोटी बस स्थानकावर प्रवासी वर्गांना थांबण्यासाठी अन्य पर्यायी जागा नसल्यामुळे या ठिकाणी दररोज शेकडो प्रवासी व शालेय विद्यार्थीबसच्या प्रतीक्षेत बसून राहतात.
मात्र या निवारा शेडच्या स्वच्छतेकडे जांबोटी ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाल्यामुळे, निवारा शेडमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज पसरले आहे. यामध्ये खाद्यपदार्थ खाल्लेल्या प्लास्टिकच्या पिशव्या तसेच गुटखा पाकिटे व रात्रीच्या वेळी तळीरामनी फस्त केलेली रिकामी दारूची पाकिटे आदी पदार्थ पडून राहिल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरच शिवाजी महाराजांचा पुतळा असल्यामुळे या परिरातील स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवभक्तामधून देखील नाराजी व्यक्त होत आहे. तरी जांबोटी ग्राम पंचायतच्या पीडीओ व कार्यदर्शनी लक्ष घालून निवारा शेडची त्वरित साफसफाई करावी, अशी मागणी प्रवासी वर्ग व नागरिकांमधून होत आहे.









