प्रतिनिधी / शिरोडा
कचरा समस्येवर सर्वच लोकप्रतिनिधी बोलतात. पण बोरी पंचायतीच्या सरपंचानी चालता बोलता कचरा गोळा करण्याचा अभिनव उपक्रम स्वत:हून सुऊ केला आहे. सकाळी मॉर्निंग व्हॉकसाठी निघताना सरपंच दुमिंगो वाझ रस्त्याच्या बाजूला विखुरलेला प्लास्टिक कचरा हाताने गोळा करतात व मोठ्या काळ्या पिशव्यांमध्ये तो साठवतात. बोरी येथील शिरशिरे रस्त्यावऊन सकाळी लवकर चालत गेल्यास हे सरपंच कचरा गोळा करताना दिसतील.
सरपंच दुमिंगो वाझ हे पेशाने शिक्षक असून कचरा निर्मुलनाची सुरुवात त्यांनी स्वत:पासूनच केली आहे. रोज सकाळी 6 वा. शिरशिरे बोरी रस्त्यावरून चालत जाताना बाजूला पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा ते हाताने जमा करतात. हा कचरा साठवण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी मोठ्या काळ्या पोत्या ठेवलेल्या आहेत. या पोत्यांमध्ये ते कचरा जमा करतात. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोर्निंग वॉकच्या वेळी त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून शुद्ध हवाही प्रदुषित होत आहे. त्यावर उपाय म्हणून उघड्यावर टाकले जाणारे प्लास्टिक गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. आपण सहज चालता बोलता हा कचरा गोळा करू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने थोडा वेळ दिल्यास व उघड्यावर कचरा फेकणे बंद केल्यास त्यावर नियंत्रण येऊ शकते. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहता येणार नाही. कचरा निर्मुलन व स्वच्छता ही आपलीही जबाबदारी आहे. त्याची सुरुवात स्वत:पासूनच करावी लागेल, असे सरपंच वाझ सांगतात. कचरा हा मुळात आपणच तयार करतो. त्यामुळे त्याची योग्य विल्हेवाट लावणे ही आपली जबाबदारी ठरते. याचे भान ठेवल्यास कचऱ्याची समस्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येईल, असे त्यांना वाटते. ‘आधी केले, मगची सांगितले’ हा संदेश जणू ते या उपक्रमातून देत आहेत.








