ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मानाच्या गणपतींमुळे पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो. मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकीआधी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून विसर्जन मिरवणुकीला परवानगी मिळावी, अशी याचिका गणेश मंडळांकडून करण्यात आली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे याचिकाकर्त्या मंडळांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची 130 वर्षांची मोठी परंपरा आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक महात्मा फुले मंडईतून सुरू होते. लक्ष्मी रस्तामार्गे डेक्कन जिमखान्यावर मुठा नदीपात्रात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करून मिरवणूक संपते. दरवर्षी सुमारे 25 ते 30 तास मिरवणूक चालते. मात्र, याचा फटका मानाचे गणपती वगळता इतर गणपती मंडळांना विशेषत: पूर्व भागातील मंडळांना बसतो. पूर्व भागातदेखील शंभर वर्षापूर्वीपासून गणेशोत्सव करणारी अनेक मंडळे आहेत.
अधिक वाचा : मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्ली-हरियाणासह 30 ठिकाणी ईडीची छापेमारी
रविवार पेठेतील 130 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या बढाई समाज तरूण मंडळ व पांगुळ आळी गणेश मंडळाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मानाच्या गणपती मंडळांमुळे विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत बारा-बारा तास थांबावे लागते. त्यामुळे वेळेत विसर्जन करता येत नाही. यावर उपाय म्हणून मानाच्या गणपती मंडळांच्या आधी लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी या दोन्ही मंडळांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात अशी याचिका करणचं चुकीचं आहे. आता तात्काळ यावर निर्णय देता येणार नाही, असं म्हणत कोर्टाने ही याचिका फेटाळली.