खेड :
गणरायाचे आगमन अवघ्या 7 दिवसांवर येऊन ठेपल्याने चाकरमान्यांना आता गावी येण्याचे वेध लागले आहेत. मध्य, कोकण व पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या 302 गणपती स्पेशलच्या फेऱ्यांपैकी सीएसएमटी-सावंतवाडी, सीएसएमटी-रत्नागिरी, एलटीटी-सावंतवाडी, सीएसएमटी-सावंतवाडी, एलटीटी-सावंतवाडी गणपती स्पेशल गाड्यांची धडधड 22 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दिवा-खेड अनारक्षित मेमू स्पेशलही शुक्रवारपासून सेवेत दाखल होणार आहे.
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेली 01151/01152 क्रमांकाची सीएसएमटी-सावंतवाडी गणपती स्पेशल, 01153/01154 क्रमांकाची सीएसएमटी-रत्नागिरी स्पेशल, 01167/01168 क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी, 01171/01172 क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी गणपती स्पेशल, 0113/0114 क्रमांकाची सीएसएमटी-सावंतवाडी गणपती स्पेशल या फेऱ्या 22 ऑगस्टपासून धावणार आहेत.
01133/01132 क्रमांकाची दिवा-खेड अनारक्षित मेमू स्पेशलही 22 ऑगस्टपासून धावणार आहे. शुक्रवारपासून गणेशभक्तांची गावी येण्याकरिता लगबग सुरू होण्याच्या शक्यतेने रेल्वे प्रशासनही सज्ज झाले आहे.
- आणखी दोन गणपती स्पेशल
मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेकडूनही जादा गणपती स्पेशल गाड्यांचा सपाटा सुरू झाला आहे. कोकण मार्गावर विश्वमित्री-रत्नागिरीसह उधना-रत्नागिरी साप्ताहिक गणपती स्पेशलच्या फेऱ्या धावणार आहेत. वसईमार्गे धावणाऱ्या फेऱ्यांचे आरक्षणही खुले झाले आहे.
09120/09119 क्रमाकांची विश्वामित्री-रत्नागिरी साप्ताहिक स्पेशल 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत दर सोमवारी धावेल. विश्वामित्री येथून सकाळी 8 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 8 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरी येथून रात्री 9 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता विश्वामित्री येथे पोहचेल. या स्पेशलला भरुज, सुरत, वलसाड, वापी, डहाणू, पालघर, वसई, भिवंडी, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर स्थानकात थांबे आहेत.
09022/09021 क्रमांकाची उधना-रत्नागिरी साप्ताहिक गणपती स्पेशल 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान दर गुरुवारी धावेल. रत्नागिरी येथून सकाळी 10 वाजता सुटून त्याचदिवशी सकाळी 8 वाजता उधना येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात उधना येथून रात्री 9 वाजता सुटून रत्नागिरी येथे पोहचेल.
- परतीसाठी चिपळूण – पनवेल अनारक्षित मेमू स्पेशल
गणेशोत्सवाकरिता गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीसाठी कोकण मार्गावर चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमो स्पेशल चालवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी जाहीर केले. त्यानुसार 5 सप्टेंबरपासून स्पेशलच्या सहा फेऱ्या धावणार आहेत.
01160 / 01159 क्रमांकाची चिपळूण-पनवेल मेमू अनारक्षित मेमू स्पेशल 5, 6, 7 सप्टेंबर दरम्यान धावेल. चिपळूणहून सकाळी 11.05 वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून सायंकाळी 4.40 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 9.55 वाजता चिपळूणला पोहोचेल. आठ डब्यांची मेमू स्पेशल आंजणी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे स्थानकात थांबेल.








