ढोल ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन
खानापूर : खानापूर शहर तसेच तालुक्यात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात भक्तिमय व उत्साही वातावरणात घरगुती आणि सार्वजनिक गणेशाचे तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात सकाळपासूनच सवाद्य आगमन झाले. सायंकाळपर्यंत गणरायाचे आगमन सुऊच होते. डोक्यावरुन, रिक्षातून आणि चारचाकी वाहनातून घरगुती गणेशमूर्ती नेण्यात येत होत्या. यासाठी पारंपरिक वाद्ये तसेच फटाकड्यांचीही आतषबाजी करण्यात येत होती. शहरात सकाळी 7 पासूनच मूर्तिकारांच्या कार्यशाळेत घरगुती गणपती घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी सुरुवात केली होती. दिवसभर पावसाची रिमझिम सुरु असतानादेखील गणेश भक्तांचा उत्साह ओंसडून वाहत होता.
फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशाचा गजर दिवसभर सुरुच होता. सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाच्या आगमनाची मिरवणूक सायंकाळी उशीरा सुरू झाल्या. यामध्ये शहरातील सर्वात जुन्या बालमंडळ तसेच निंगापूर गल्लीतील चव्हाटा गणेशोत्सव मंडळ तर रेल्वेस्टेशन विद्यानगर येथील गणेशोत्सव मंडळ, चौराशी देवी गणेशोत्सव मंडळ, बाजारपेठ गणेश मंडळ, मेदर गल्ली गणेशोत्सव मंडळ, महाराष्ट्र युवक मंडळ स्टेशनरोड तसेच दुर्गानगर, नाईक गल्ली, शिवाजीनगर, हलकर्णी, रुमेवाडी क्रॉस या गणेश मंडळानी आपल्या गणेशमूर्तीची शहरातून फटाक्यांच्या आतषबाजीत गणेशमूर्तीची मिरवणूक काढली. शहरासह आसपासच्या उपनगरातील गणेश मंडळांनी आपापल्या परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई केल्याने संपूर्ण शहर विद्युतरोषणाईत न्हाऊन निघाले आहे.
ग्रामीण भागातही गणरायाचे स्वागत
शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागातही गणरायाचे उत्साही स्वागत झाले. गणेशभक्तानी आपल्या घरगुती गणपतीचे स्वागत करून घरोघरी मंगलमय वातावरणात पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. पुढील दहा दिवस घरगुती गणपतींची पूर्जा, अर्चा, आरती करण्यात येणार आहे. तसेच पुढील दहा दिवसात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस या गणपतीचे आपापल्या पद्धतीप्रमाणे विसर्जन करण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत घराघरातील गणरायाची प्रतिष्ठापना केली. नंदगडसह येथे गावात गेल्या कित्येक वर्षापासून ‘एक गाव एक गणपती’ प्रथा सुरू आहे. त्या गावामध्ये सर्व गावकरी एकत्र येऊन एकच सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
शासकीय कार्यालयातही गणरायाचे स्वागत
खानापूर शहरातील शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय, जिल्हा पंचायत उपविभाग, पोलीस ट्रेनिंग सेंटर, पोलीस स्टेशन, हेस्कॉम कार्यालय तसेच केएसआरटीसी आदी कार्यालयांचा प्रामुख्याने समावेश आहे. खानापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी मिळून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाला प्रारंभ केला आहे. सदर गणेशोत्सव कन्नड शाळेच्या आवारातील एका इमारतीत बसवला जातो. या सर्व शासकीय गणपतींची प्रतिष्ठापना दुपारीच करण्यात आली.
बकऱ्यांची खरेदीही जोमात
तालुक्यात मराठी बाहूल पट्ट्यात गणपतीच्या दुसरे दिवशी ऋषी पंचमीदिवशी हुंदरी परंपरा पाळली जाते. या दिवसी गावात बकरी मारण्याची परंपरा आहे. यावर्षी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी व शुक्रवारी हुंदरीचा सण आल्याने ग्रामीण भागात उत्साहाने हा सण साजरा करण्यात येणार आहे. यासाठी खानापूर, नंदगडमधील बकरी बाजारातून मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची खरेदीही झाली आहे.
कणकुंबी भागात गणरायाचे स्वागत
गोवा व कोकणपट्टीची संस्कृती असलेल्या कणकुंबी भागात गणरायाचे उत्साहात स्वागत झालेले असून सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच घरगुती गणपती थाटामाटात विराजमान झाले आहेत. विशेषत: कणकुंबी आणि परिसरातील चोर्ला, चिखले, पारवाड, चिगुळे, बेटणे व इतर गावांमध्ये घरगुती गणपतींची सजावट पाहण्यासारखी असते. कणकुंबी भागातील अनेक तरुण मंडळी गोवा, मुंबई व इतर ठिकाणी कामानिमित्त असतात. मात्र हे सर्व चाकरमानी गणेश चतुर्थी आणि शिमगा या दोन्ही सणांना आवर्जून उपस्थित राहतात. कणकुंबी भागातील अतिशय धार्मिक आणि पावित्र जपणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थीचा उत्सव. सार्वजनिक गणपती अनंत चतुर्दशीपर्यंत तर घरगुती गणपती काही गावांमध्ये पारंपारिक पद्धतीप्रमाणे पाच दिवस तर काही गावांमध्ये पंचांगाप्रमाणे गौरी गणपती विसर्जन दिवसापर्यंत धार्मिक पद्धतीने पूजाअर्चा केली जाते.









