फेरीवाल्यांना हटवण्यात आल्याने व्यापाऱ्यांतून समाधान : कारवाईत सातत्य ठेवण्याची नागरिकांची मागणी
बेळगाव : शहरातील बैठे विक्रेते आणि फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गणपत गल्लीने मोकळा श्वास घेतला असून पोलिसांच्या या कारवाईत सातत्य ठेवण्यात यावे, अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरातील वाहतूक व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहने उभी करण्यास पार्किंगची जागा अपुरी पडत असल्याने वाहन चालक जागा मिळेल त्याठिकाणी वाहने पार्क करत आहेत. त्याचबरोबर एकेरी मार्गातूनही (वनवे) वाहने हाकली जात आहेत. पण वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. पोलीस सध्या केवळ वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
महानगरपालिकेच्या वतीने देखील पार्किंगसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पार्किंगची समस्या आणखीनच गंभीर बनली आहे. बाजारपेठेतील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, रविवार पेठ, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली आदी ठिकाणी बैठे विक्रेते तसेच फेरीवाल्यांकडून मनमानी पद्धतीने रस्त्यावर थांबून व्यापार केला जात आहे. अशा व्यापाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होण्यासह त्याठिकाणच्या व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी दुकाना व्यतिरिक्त बाहेर अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करण्यासह रस्त्याकडेला बसलेले भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते व इतर बैठे विक्रेत्यांसह फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांना मुख्य बाजारपेठेतून हटवण्यात आल्याने गेल्या दोन दिवसांपासून गणपत गल्लीने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे. ही कारवाई काही दिवसातच न गुंडाळता सातत्य ठेवावे, अशी मागणी केली जात आहे.
कारवाईत सातत्य हवे
मुख्य बाजारपेठ असलेल्या गणपत गल्लीत बैठे विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून दुकानांसमोरच व्यवसाय केला जात होता. त्यामुळे याचा फटका वाहतूक व्यवस्थेसह जनतेला सहन करावा लागत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून फेरीवाल्यांना पोलिसांनी हटवले असल्याने गणपत गल्लीने मोकळा श्वास घेतला आहे. पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज आहे.
– रमेश पावले,व्यापारी, गणपत गल्ली









