सुईपासून सोन्यापर्यंत सर्व काही मिळणारी बाजारपेठ
अमित कोळेकर/बेळगाव
भूतकाळाच्या खुणा जपणारी गल्ली
बेळगाव शहराच्या हृदयस्थानी वसलेली गणपत गल्ली ही केवळ व्यापारी केंद्र नाही, तर ती बेळगावच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक प्रवासाची जिवंत साक्ष आहे. पूर्वी ही गल्ली तेली गल्ली किंवा घाणेगर गल्ली म्हणून प्रसिद्ध होती. कारण या भागात तेली समाजाच्या लोकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात होते. त्यांच्या घरी मोठमोठे घाणे असायचे, जिथे बैलजोडीने शेंगदाणे, कुसबी आणि इतर बियांपासून तेल काढले जायचे. हे तेल इतके शुद्ध आणि सुगंधी असायचे की बेळगावसह गोवा आणि चंदगडपर्यंत त्याची ख्याती पसरली होती. तेली समाजातील लोक आपापल्या घरासमोर तेल विकायचे आणि हळूहळू ही गल्ली व्यापारी केंद्र बनली. कालांतराने ही गल्ली या गल्लीतील खासबाग बंधू यांच्या खासगी श्री गणेश मंदिरामुळे “गणपत गल्ली” म्हणून नावारूपास आली.
तळ्यांपासून वस्तीपर्यंतचा प्रवास
आज गणपत गल्लीत गर्दीने फुललेली बाजारपेठ दिसते. तिथे एकेकाळी विस्तीर्ण पाण्याचे तळे होते. हे तळे जवळच असलेल्या काकतीवेसपर्यंत पसरलेले होते आणि परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचे होते. काळाच्या ओघात हे तळे आटले, आणि या जागेवर मातीचा भराव टाकून वस्ती निर्माण झाली. लोकांनी येथे आपली घरे बांधली, लहानमोठे व्यवसाय सुरू केले आणि पाहता पाहता हा परिसर एक गजबजलेला नागरी केंद्र बनला. या गल्लीला, भोई गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गली, कडोलकर गल्ली, रविवार पेठेला जोडणारा चावी मार्केट अशा गल्ल्या येऊन मिळतात, ज्याने गल्लीला खऱ्या अर्थाने व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे.
गणपत गल्लीला व्यापारी वैभव
‘सुईपासून सोन्यापर्यंत सर्व काही मिळणारी बाजारपेठ’ अशी ओळख असलेली गणपत गल्ली आजही बेळगावच्या व्यापारी नकाशावर अग्रस्थानी आहे. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत ही गल्ली ग्राहकांच्या गर्दीने फुललेली असते. येथील व्यापारी दर्जेदार माल, योग्य किंमत आणि ग्राहकसेवेबाबत प्रसिद्ध आहेत. पूर्वीच्या काळात शनिवारचा बाजार या गल्लीत भरायचा. गावागावातून लोक येऊन भाजीपाला, धान्य, कपडे, भांडी, खरेदी विक्रीसाठी येत असत तसेच या गल्लीत दर शनिवारी कोंडा बाजार आणि कोंबड्यांचा बाजार भरत असे. तो काही अंशी आजही भरविला जातो. हळूहळू स्थायी दुकाने उभी राहिली आणि आज येथे मोठ्या प्रमाणात कापड व्यावसायिक, स्टेशनरी, किराणा, हार्डवेअर, गृहोपयोगी वस्तू, प्लास्टिक, पूजेचे साहित्य, ड्रायफ्रूट्स, चपलांची दुकाने, कॉस्मेटिक आणि इलेक्ट्रीकलसह फळ व फुलांची तसेच सोन्या चांदीची दुकाने यांची रांगच लागली आहे. याशिवाय या गल्लीत जुने संतोष आणि निर्मल अशी दोन जोड चित्रपटगृहे असल्याने नागरिकांची गर्दी या गल्लीने नेहमी खेचून आणली आहे. आणि म्हणूनच आज या गणपत गल्लीला बेळगावकर “शहराची गंगा” असे म्हणतात, कारण ती अखंड प्रवाहित आहे, सतत जीवनाने आणि हालचालीने ओतप्रोत भरलेली आहे.
शिक्षणाचा वारसा-शाळा क्रमांक 2
गणपत गल्लीतील एक मोठा अभिमान म्हणजे सरकारी मराठी शाळा क्र. 2, जी सन 1864 साली स्थापन झाली. ही शाळा ब्रिटिशकाळातील आहे आणि बेळगावमधील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जाते. या शाळेतून असंख्य विद्यार्थी शिक्षित झाले, ज्यांनी पुढे विविध क्षेत्रात नाव कमावले. आजही ही शाळा आपली परंपरा जपत आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे.
बेळगावच्या ज्ञानपरंपरेचा पाया- सार्वजनिक वाचनालय (स्थापना : 1848)
गणपत गल्लीचा इतिहास सांगताना तिच्या व्यापारी आणि सांस्कृतिक ओळखीइतकाच आणखी एक अभिमानाचा पैलू उल्लेखनीय आहे तो म्हणजे बेळगावमधील सर्वात जुनं सार्वजनिक वाचनालय. सन 1848 मध्ये स्थापन झालेलं हे वाचनालय आज जवळपास दोन शतकांचा इतिहास आपल्या अंगावर बाळगून उभं आहे. त्या काळी शिक्षण आणि वाचनाची साधनं अत्यंत मर्यादित होती, तरीही शहरातील सुशिक्षित आणि सामाजिक जाण असलेल्या नागरिकांनी ज्ञानप्रसारासाठी हे वाचनालय उभारलं. हे वाचनालय केवळ पुस्तकांचं भांडार नव्हतं, तर बेळगावच्या बौद्धिक, स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक चळवळीचं केंद्र बनलं. आज डिजिटल युगातही या ब्रिटिशकालीन वाचनालयाचा दरवाजा उघडला की, जुन्या काळाचा सुगंध आणि अक्षरप्रेमाची ऊब मनाला जाणवते. गणपत गल्लीच्या मध्यभागी उभं असलेलं हे सार्वजनिक वाचनालय म्हणजे बेळगावच्या ज्ञानपरंपरेचा जिवंत वारसा. ज्याने शहराला विचारशील आणि सुसंस्कृत बनवण्याचं कार्य जवळपास दीडशेहून अधिक वर्षे अखंडपणे ज्ञानदीप प्रज्वलित ठेवलं आहे.
संस्कृती अन् उत्सवांची शान
गणपत गल्ली ही फक्त व्यापारासाठीच नव्हे, तर संस्कृतीसाठीही प्रसिद्ध आहे. दरवर्षी श्री गणेशोत्सव अत्यंत देखणा आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. येथील श्री गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती आणि सजावट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक गर्दी करतात. तसेच शिवजयंती, स्वातंत्र्यदिन, दसरा आणि इतर सणही एकत्र येऊन साजरे केले जातात. या सर्व कार्यक्रमांतून समाजातील एकता, सहकार्य आणि सामाजिक जागरुकता यांचे दर्शन घडते.
सिंधी समाजाची प्रेरणादायी कहाणी
भारत-पाकिस्तान विभाजनानंतर अनेक सिंधी बांधव भारतात स्थलांतरित झाले. त्यापैकी काही कुटुंबांनी बेळगावात, विशेषत: गणपत गल्लीत आपला आश्रय घेतला. सुरुवातीला त्यांनी रस्त्याच्या कडेला बसून आपली लहान दुकाने चालवली. हळूहळू त्यांनी परिश्रमाने व्यवसाय वाढवला आणि स्वत:ची दुकाने उभी केली. सिंधी समाजाने गणपत गल्लीत आपली ओळख निर्माण केली आणि समाजकार्य, दानशूरता व सांस्कृतिक उपक्रम याद्वारे आपले स्थान मजबूत केले. त्यांनी पुढे मराठी शाळा क्रमांक दोनमध्ये गणपत गल्ली श्री गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीसोबतच आपल्या सिंधी समाजाच्यावतीनेही गणेशोत्सवाची स्थापना केली. त्यामुळे शाळेच्या परिसरात एकूण दोन गणेशमूर्तींची स्थापना केली जाते, त्यांचा देखावा पाहण्यासाठी बेळगाव शहर आणि आसपासच्या खेड्यांतील नागरिक मोठ्या संख्येने भेट देतात.
सारांश बेळगावची ‘गंगा’
गणपत गल्ली म्हणजे परंपरा, संस्कृती, व्यापार आणि समाजभावना यांचे सुंदर मिश्रण. ती जुनी आहे, पण सतत नव्याने फुलत राहणारी आहे. येथील व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक मंडळे आणि नागरिक यांचा परस्पर सहकार्याचा भाव या गल्लीला आजही बेळगावच्या सामाजिक जीवनाचे केंद्र बनवतो. जुने तेलाचे घाणे आता नाहीसे झाले असले तरी त्या श्रमांचा, निष्ठेचा आणि परंपरेचा सुगंध अजूनही हवेत दरवळतो आणि म्हणूनच ‘गणपत गल्ली ही बेळगावची आत्मा आहे; जिथे इतिहास बोलतो, संस्कृती झळकते आणि लोकजीवन धडधडते.’
बेळगावच्या ऐतिहासिक गल्ल्यांच्या कहाण्या
‘माझं वेणुग्राम‘ या विशेष मालिकेद्वारे बेळगावच्या ऐतिहासिक,सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाने नटलेल्या गल्ल्यांच्या कहाण्या उलगडल्या जात आहेत. या मालिकेतून वाचकांना शहरातील प्रत्येक गल्लीचा आत्मा, तिचं गतवैभव, परंपरा आणि लोकजीवन अनुभवता येईल. प्रत्येक भागात बेळगावच्या सांस्कृतिक आणि वारशाची नवी पानं उघडली जातील. ही मालिका केवळ इतिहासाचा मागोवा घेणारी नाही, तर आजही संस्कृतीचा दीप जपणाऱ्या गल्ल्यांचा सन्मान करेल. वाचकांनी आणि प्रेक्षकांनी ‘तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनेल, तरुण भारत न्यूज बेळगाव या फेसबुकवर तसेच दैनिक आवृत्तीत या मालिकेचे भाग पाहावेत.
शाहू महाराजांचा स्नेहबंध
गणपत गल्लीचा इतिहास सांगताना एक मनोरंजक आणि अभिमानास्पद प्रसंग उल्लेखनीय आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या स्नेहबंधामुळे येथील अप्पयापा शिवलिंगाप्पा बाळेकुंद्री यांना बैलांची जोडी भेट म्हणून दिली होती. ही घटना आजही बाळेकुंद्री कुटुंबासाठी अभिमानाचा विषय आहे आणि त्या काळातील बेळगाव-कोल्हापूर मैत्रीचे प्रतीक आहे.









