मूसेवालाच्या हत्येनंतर झाला होता फरार : दुबईतून चालवायचा लॉरेन्स टोळी
वृत्तसंस्था/ अबुधाबी
अभिनेता सलमान खानला धमकी देणारा गँगस्टर विक्रम बराड अखेर भारतीय तपास यंत्रणेच्या हाती लागला आहे. बराड हा पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येत सामील होता आणि तेव्हापासूनच तो फरार होता. हत्या अन् खंडणीवसुलीसमवेत 11 प्रकरणी विक्रम बराड वाँटेड होता. एनआयएने लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी विक्रमजीत सिंह अन् विक्रम बराड यांना युएईकडून भारतात प्रत्यार्पित करण्यात आल्यावर त्वरित अटक केली आहे.
सलमान खानला धमकी देण्यात आल्याप्रकरणी लॉरेन्सचा खास हस्तक विक्रम बराडचे नाव समोर आले होते. विक्रम दुबईतून गँगस्टर लॉरेन्सची टोळी चालवित होता असे सांगण्यात येते. बराडला आता संयुक्त अरब अमिरातमधून भारतात आणले गेले आहे.
बराड हा राजस्थानचा कुख्यात गँगस्टर आनंदपाल सिंहचा देखील निकटवर्तीय राहिला आहे. बराड हा चंदीगड अन् त्याच्या आसपास स्वत:च्या गुन्हेगारी कारवाया घडवून आणत होता. देशभरात त्याच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि उत्तरप्रदेश पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता.
लॉरेन्स बिश्नोई अन् गोल्डी बराड यासारख्या गँगस्टर्सच्या मदतीने विक्रम बराड हा भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी अन् खंडणीवसुली करत होता. 2020 पासून तो फरार होता. युएईतून विक्रम बराडला भारतात आणण्यासाठी एनआयएचे एक पथक तेथे पोहोचले होते.
सुरक्षा यंत्रणा यंत्रणांनी सचिन बिश्नोई या गुन्हेगाराच्याही मुसक्या आवळल्या आहेत. सचिन बिश्नोई हा सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा सूत्रधार लॉरेन्स बिश्नोईचा नातेवाईक आहे. गँगस्टर सचिनला अझरबैजानमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. सचिन बिश्नोईला लवकरच अझरबैजान येथून भारतात आणले जाणार आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा कट सचिन बिश्नोईनेच रचला होता असा आरोप आहे. बनावट पासपोर्टच्या मदतीने त्याने अझरबैजानमध्ये पळ काढला होता.









