भारताकडून प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू : पासपोर्ट ब्लॉक, रेड कॉर्नर नोटीस जारी
वृत्तसंस्था/रांची
झारखंड पोलिसांसाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेला गुंड मयंक सिंग उर्फ सुनील मीणा याला युरोपमध्ये अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी मयंक सिंगच्या अटकेला दुजोरा दिला आहे. मयंक सिंग हा झारखंडमधील कुख्यात गँगस्टर अमन साओ आणि लॉरेन्स बिश्नोई यांचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. तो सध्या इंटरपोलच्या ताब्यात असून प्रत्यार्पणासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. मयंकची ओळख पटताच त्याच्यावर झारखंड एटीएसने पुढील कारवाई सुरू केली. झारखंड पोलिसांच्या लेखी विनंतीवरून सुनील मीणा याचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. तसेच त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती.
झारखंड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुख्यात मयंक सिंगला युरोपमधील अझर बैजान येथून अटक करण्यात आली आहे. झारखंड एटीएसने मयंक सिंगविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. त्याअंतर्गत मयंकला अटक करण्यात आली आहे. मयंक सिंग हे गुन्हेगारी जगतात एक प्रसिद्ध नाव आहे. कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा बालपणीचा मित्र मयंक सिंग याचे पूर्ण नाव सुनील सिंग मीना असे आहे. लॉरेन्स आणि मयंक यांनी एकत्रच गुन्हेगारीच्या दुनियेत प्रवेश केल्याचे बोलले जाते. अनेक गुह्यांमध्ये तो तुरुंगातही गेला आहे, मात्र गेल्या दोन वर्षांपासून तो लॉरेन्सच्या सांगण्यावरून मलेशियामध्ये बसून झारखंडचा कुख्यात गुंड अमन साओसोबत काम करत होता. मयंक सिंग हा अमन आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे.









