वृत्तसंस्था / पाटणा
बिहारची राजधानी पाटणा येथील जक्कनपूर भागात शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या पोलिस आणि गुंड यांच्या चकमकीत एका गँगस्टरचा खात्मा करण्यात आला आहे. या गँगस्टरचे नावर अजय कुमार राय ऊर्फ काका असे असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चकमकीत एका पोलिसालाही किरकोळ जखमा झाल्या असून त्याच्यावर उपचार होत आहेत. अजय राय आणि त्याचे सहकारी या भागात लपले आहेत, अशी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी येथे धाड टाकली.
त्यावेळी गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गुंडांची कोंडी करुन त्यांच्यावर गोळीबार केला. दोन्ही बाजूंकडून किमान 18 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती देण्यात आली. एक गोळी अजय राय यांच्या मर्मस्थानी लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. साधारणत: दीड तास ही चकमक होत होती, अशीही माहिती प्रशासनाने दिली आहे.









