टोळीयुद्धातून हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबच्या अमृतसरमध्ये बुधवारी सकाळी 11.30 वाजता झालेल्या एका टोळीयुद्धात गँगस्टर जरनैल सिंहचा मृत्यू झाला आहे. अमृतसर ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सतिंदर सिंह यांनी या घटनेची पुष्टी दिली आहे. सठियाला गावात ही घटना घडली आहे. जरनैल सिंहच्या विरोधी टोळीतील तीन हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात जरनैल सिंहचा मृत्यू झाला आहे. ही घटना एका सीसीटीव्हीमध्ये कैद असून याचे फुटेज मिळवत पोलिसांनी तपासास प्रारंभ केला आहे. पंजाबमध्ये मागील काही काळात गुंडांच्या टोळ्यांमध्ये संघर्ष दिसून येत आहे. या संघर्षात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या गुंडांच्या टोळ्यांचे म्होरके विदेशात असून तेथून ते स्वत:च्या गुन्हेगारी कारवाया घडवून आणत आहेत.









