अमेरिकन पोलिसांनी मृत्यूचे वृत्त फेटाळले
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील मुख्य आरोपी आणि पंजाब पोलिसांना हवा असलेला गँगस्टर गोल्डी ब्रारच्या मृत्यूची बातमी अफवा ठरली आहे. अमेरिकेच्या पोलिसांनी हत्येचे वृत्त फेटाळून लावले आहे. ब्रार याच्या मृत्यूची बातमी बुधवारी सोशल मीडिया आणि वेबसाईटवरून व्हायरल करण्यात आली होती. मंगळवारी संध्याकाळी फ्रेस्नोच्या वायव्य भागात फेअरमाँट आणि होल्ट मार्गांवर गोळीबाराची नोंद झाल्यानंतर दोन लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्याला ऊग्णालयात दाखल करण्यात आले. मरण पावलेल्या व्यक्तीला गोल्डी ब्रार समजून त्याच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली होती. यानंतर डल्ला-लखबीर गटाने गोळीबाराची जबाबदारी घेत गोल्डी ब्रारची हत्या केल्याचा दावा केला होता. पॅनडामध्ये राहणाऱ्या ब्रार याने सध्या अमेरिकेत आश्र्रय घेतला आहे. बनावट कागदपत्रांद्वारे तो येथे दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. तो श्री मुक्तसर साहिब, पंजाबचा रहिवासी असून त्याचे खरे नाव सतींदर सिंग उर्फ सतींदर सिंगजीत सिंग आहे. पॅनडामध्ये राहून अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. केंद्र सरकारने त्याला दहशतवादी घोषित केले आहे. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मुख्य संशयित म्हणून त्याचे नाव पुढे आले होते.









