ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात सोडून गंगावणे कुटुंबाने पुण्याकडे परण्यासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली अन् बुलढाण्याजवळ काळाने घाला घातला. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात गंगावणे कुटुंबातील पत्नी-पत्नीसह मुलीचा होरपळून मृत्यू झाला. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील हे कुटुंब होतं. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात नोकरीनिमित्त ते राहत होते.
कैलास गंगावणे, कांचन गंगावणे आणि मुलगी सई गंगावणे अशी अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. कैलास गंगावणे हे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात शिक्षक होते. त्यांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. मुलाला महाविद्यालयात सोडून गंगावणे कुटुंबीय पुण्याच्या दिशेने निघाले होते. बुलढाण्यातील पिंपळखुटा येथे ते प्रवास करत असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात झाला. त्यानंतर ट्रॅव्हल्सने पेट घेतला. यात 26 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
अपघातानंतर गंगावणे कुटुंबातील तिघांचाही फोन लागत नसल्याने कैलास गंगावणे यांचे मेव्हणे अमर काळेंनी त्यांचा शोध सुरू केला. पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली असता विदर्भ ट्रॅव्हल्समधून प्रवासाला निघालेल्या यादीत गंगावणे कुटुंबातील तिघांचाही समावेश असल्याचे पोलीसांनी सांगितले. त्यानंतर काळे आणि गंगावणे कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मृत साई ही गंगावणे ही मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिला गुणवत्तेवर आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाला होता.
दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातात दगावलेल्या प्रवाशांच्या मृतदेहांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवणंदेखील अवघड झालं असून, मृतदेहांची डीएनए टेस्ट करुन ओळख पटवावी लागणार आहे. सरकारी यंत्रणा सध्या बसमधील प्रवाशांची माहिती घेऊन त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचं काम करत आहे.








