पावसामुळे या घरात राहणे धोकादायक बनले होते
By : जयश्री येसादे
उत्तूर : आरदाळ येथील आजोबांच्या घरावरील जुने मोडकळीस आलेले खापरी छप्पर काढून लोखंडी पत्र्यांचे छप्पर बसवले. हेल्पिंग हँड्स फाउंडेशन, उत्तूर (ता. आजरा) यांच्या पुढाकारातून समाजातील निस्वार्थी मदतीच्या हातांमुळे हा उपक्रम यशस्वी झाला. निराधार कांबळे यांना आधार मिळाला आहे.
आरदाळ येथील वयोवृद्ध आजोबांच्या मागे कुणीही नाही, त्यांच्या घराचे छप्पर पूर्णपणे गळके झाले होते. पावसामुळे या घरात राहणे धोकादायक बनले होते. ही बाब समजताच हेल्पिंग हँड्स फाउंडेशनच्या सदस्यांनी पाहणी करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कामासाठी मंगेश शिंत्रे (शिंत्रे कन्स्ट्रक्शन), रणजित घेवडे, शुभम धुरे, अजिंक्य पाटील, प्रथमेश तेली, तौशिक लमतुरे, प्राजक्ता सपाटे, विश्वनाथ सावेरकर, तसेच नाव न सांगता मदत करणारे पुढे आले. श्रमदानासाठी सैगल ढालाईत, मनोज भाईगडे, रणजित घेवडे, सौरभ वांजोळे, अभिषेक जाधव, ओमकार खाडे, वैभव गुरव, तौसिफ लमतुरे यांचा सहभाग होता.
तसेच शिंत्रे कन्स्ट्रक्शन आणि गोल्डन फॅब्रिकेशन यांनी तांत्रिक व साहित्य सहकार्य केले. हेल्पिंग हँड्स फाउंडेशनचे सर्व सदस्यांचा सहभाग होला. सर्वांच्या सहकार्याने अल्पावधीत छप्पर बदलले. कांबळे यांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट दिले.
आजोबांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि डोळ्यातील कृतज्ञतेचे अश्रू सर्वोत्तम पुरस्कार ठरला. सरपंच, ग्रामसेवक व गावातील सर्व दानशूर व्यक्तींनी कांबळे यांना आधार दिला. सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव, अमोल बांबरे, सुहास पाटील यांनी माहिती दिली. एका संस्थेने निधी गोळा करून फरशी घालून देण्याचा निर्णय घेतला.
विघ्नहर्ता समूहाकडून कपडे
गंगाराम कांबळे घरी एकटेच राहतात. पावसाने कपडे, अंथरुण पांघरूण भिजून गेले. उत्तूरच्या विघ्नहर्ता समूहाने स्वेटर, कपडे, अंथरूण पांघरूण याची व्यवस्था करून दिली.
मदतीने भारावलो
“पावसाने जगणं मुश्किल केले. घरावरचे छप्पर कोसळले. अजूनही माणसातील माणुसकी जिवंत असल्याचे दिसून आले. सर्वसामान्य जनतेने दिलेल्या लाख मोलाच्या सहकार्यामुळे घरावर पत्रे बसले. जगण्याला आधार मिळाला साऱ्यांच्या मदतीने भारावलो.”
– गंगाराम कांबळे, आरदाळ








