रामतीर्थनगरमध्ये 15 गुंठे जागेत 1.50 कोटी रुपये खर्चातून उभारले स्मारक
प्रतिनिधी/ बेळगाव
‘गांधी भारत’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येथील रामतीर्थनगरातील गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मारक व छायाचित्र दालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
कायदा-संसदीय व्यवहारमंत्री, तसेच काँग्रेस अधिवेशन शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष एच. के. पाटील, मानद अध्यक्ष वीराप्पा मोईली, सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री सतीश जारकीहोळी, नगरविकासमंत्री भैरती सुरेश, कन्नड-सांस्कृतिक खात्याचे मंत्री शिवराज तंगडगी, आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव, सरकारचे मुख्य प्रवक्ते अशोक पट्टण, आमदार राजू सेठ, आमदार गणेश हुक्केरी, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी, कन्नड-सांस्कृतिक खात्याच्या संचालिका डॉ. धरणीदेवी मालगत्ती, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, महापालिका आयुक्त शुभा बी., कन्नड-सांस्कृतिक खात्याचे सहसंचालक के. एच. चन्नूर, उपसंचालिका विद्यावती बजंत्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
गंगाधरराव देशपांडे स्मारक अंदाजे 15 गुंठे जागेत उभारण्यात आले आहे. 1.50 कोटी रुपये खर्चात स्मारक उभारले असून यामध्ये गंगाधरराव देशपांडे यांचा पुतळा, छायाचित्र दालन, संरक्षण भिंत, तारेचे कुंपण, पेव्हर्स आणि उद्यान तयार करण्यात आले आहे. बेळगाव तालुक्यातील हुदली गावात एका श्रीमंत घराण्यात गंगाधरराव देशपांडे यांचा 31 मार्च 1871 मध्ये जन्म झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण बेळगावच्या सरदार हायस्कूलमध्ये झाले. पुणे येथील डेक्कन महाविद्यालयात पदवी आणि बीएएलएलबी मिळविली. 1922 मध्ये चरखा संघ स्थापन केला. 1937 मध्ये हुदली येथे गांधी सेवा संघाची स्थापना केली. गोपाळकृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक यांच्या संपर्कात आलेले गंगाधरराव देशपांडे पुढे त्यांचे अनुयायी बनले.
महात्मा गांधींना देशपांडे यांनी आपल्या गावी हुदली येथे येण्याचे निमंत्रण दिले होते. हुदली येथे महात्मा गांधींचे सात दिवस वास्तव्य होते. याच काळात गांधी सेवा संघाने मेळावा भरवला होता. महात्मा गांधी यांच्याबरोबरच डॉ. बाबू राजेंद्रप्रसाद, अब्दुल गफार खान, सरदार वल्लभभाई पटेल, शौकत अली, सरोजिनी नायडू, ज्येष्ठ साहित्यिक बेटगेरी कृष्णशर्मा, जी. नारायण हेही मेळाव्यात सहभागी झाले होते.









