विद्यार्थी, पर्यटकांसह इतिहासप्रेमींतून नाराजी : प्रशासनाने त्वरित भवन सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
स्वातंत्र्य सेनानी गंगाधरराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रामतीर्थनगर येथे स्मारक भवन बांधण्यात आले आहे. 1924 मध्ये बेळगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 39 वे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाच्या शताब्दीनिमित्त हे स्मारक बांधण्यात आले होते. 26 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनानंतरही सदर स्मारक बंद अवस्थेत असून परिसराभोवती गवत वाढले आहे. परिणामी स्मारक भवन धूळखात पडले असून वापरात नसल्यामुळे नागरिकांसह पर्यटकांतून निराशा व्यक्त होत आहे.
बेळगाव येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 39 व्या अधिवेशनात गंगाधरराव देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना सन्मान देण्याच्या उद्देशाने राज्यातील काँग्रेस सरकारने स्मारक भवन बांधले. यासाठी नगरविकास प्राधिकरणाने रामतीर्थनगर येथे 15 गुंठे जागा उपलब्ध करून दिली. तसेच राज्य सरकारने स्मारक बांधकामासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यापूर्वी गंगाधरराव देशपांडे यांचे मूळगाव असलेले हुदली येथे स्मारक भवन बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र तेथे जागा उपलब्ध नसल्याने रामतीर्थनगर येथे प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली.
राज्य शासनाने मंजूर केलेल्या 1 कोटी रुपये निधीतून भवन, कुंपण, लँड स्केपिंग व इतर पायाभूत सुविधांची कामे करण्यात आली. स्मारक भवनात 1924 च्या काँग्रेस अधिवेशनातील तसेच गंगाधरराव देशपांडे यांच्या जीवनातील दुर्मीळ छायाचित्रे उपलब्ध आहेत. तथापि, स्मारक सततच्या बंदमुळे विद्यार्थी संशोधक व इतिहासप्रेमींना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या गंगाधरराव देशपांडे यांच्या जीवनकार्याच्या माहितीपासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गंगाधरराव देशपांडे स्मारक भवनाचे उद्घाटन करून एक वर्षाचा कालावधी लोटला. सदर भवन कुलूपबंद अवस्थेत असल्याने विद्यार्थी संशोधक, इतिहासप्रेमींच्या नजरा भवन चालू होण्याकडे लागल्या आहेत. यासाठी प्रशासनाने याची दखल घेऊन कुलूपबंद असलेले भवन लवकरात लवकर सुरू करून सार्वजनिकांसाठी खुले करून देण्याची गरज आहे. या दृष्टीने संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी पावले उचलण्याची मागणी होत आहे.









