महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते विधिवत पूजा
बेळगाव : शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगाव महानगरपालिकेतर्फे महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी यांच्या हस्ते गुरुवारी विधिवत पूजा-अर्चा करून गंगा पूजन करण्यात आले. बेळगाव शहराला राकसकोप व हिडकल जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने दरवर्षीपेक्षा लवकर जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे यंदा शहराला पाण्याची कमतरता भासणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी महानगरपालिकेतर्फे श्रावण महिन्यात राकसकोप जलाशयाचे गंगा पूजन केले जाते. त्यानुसार यंदाही गुरुवारी महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्त, सर्व 58 प्रभागांचे नगरसेवक, महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करून गंगा पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना महापौर मंगेश पवार म्हणाले, दरवर्षीच्या तुलनेत यंदा राकसकोप जलाशय लवकर पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्याचबरोबर यावर्षी पाण्याची कमतरता भासणार नाही. 24 तास पाणी योजनेचे काम सुरू आहे. जानेवारी, फेब्रुवारी अखेरपर्यंत काही प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास नागरिकांची सोय होईल. बेळगाव शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. दोन्ही जलाशयांतून पाण्याचा उपसा सुरू आहे. विशेषकरून राकसकोप जलाशयातून पाण्याचा कमी उपसा केला जातो, असे ते म्हणाले.









