वार्ताहर/काकती
हर हर गंगामातेच्या जयघोषात गंगापूजनाचा धार्मिक सोहळा काकती ग्राम पंचायतीच्या वतीने गावच्या समृद्धीसाठी, मोठ्या भक्तीभावाने मंगळवारी मार्कंडेय नदीकाठी पार पडला. मार्कंडेय नदी ही केवळ जलप्रवाह नसून गंगामातेचे रुप मानले जाते. पूर आला म्हणजे गंगेचे आगमन झाले. या जलामुळे जीवनाला पोषण मिळाले, याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी गंगापूजन करण्यात येते. या सोहळ्यात ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर, त्यांचे पती लक्ष्मण मुचंडीकर यांना गंगापूजनचा मान देण्यात आला. देवस्थानचे पुजारी बसय्या हिरेमठ यांनी पुजाविधीची मांडणी केली. देवस्थानचे स्वामी उदय हिरेमठ गंगाष्टक म्हणून पौरोहित्य केले. हळद-कुंकू लावून नदीची ओटी भरण्यात आली. फळे, नैवेद्य, पंचपल्लव, अक्षता, दीपदान गंगेला अर्पण करण्यात आले. सामूहिक आरती व हर हर गंगेचा जयघोष करण्यात आला. यानंतर भाविकांना प्रसाद वाटण्यात आला. यावेळी पीडीओ अरुण नाथबुवा, नारायण होळी, ग्रा. पं. सदस्य सागर पिंगट, गजानन गव्हाणे, बाबुराव पिंगट, शंकर हालण्णवर यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.









