पुणे / वार्ताहर :
बनावट कागदपत्रांच्या आधारे बंद अवस्थेत असलेले मोबाईल टॉवर हेरून टॉवरचे साहित्य चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करून 6 जिह्यातील 10 चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळीमध्ये टॉवर कंपनीतील दोन अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
रमेश मल्लाप्पा गरसंगी (वय 33, रा. मळघन ता. बसवन बागेवाडी जि. विजयपुरा कर्नाटक), प्रशांत वामन यादव (31 रा. वडकी ता. हवेली मूळ रा. हर्णे ता. पुरंदर, पुणे), सुहास श्रीराम लाड (40 रा. मांजरी बु), जावेद हमीदुल्ला खान (33 रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे) आणि सचिन गणपत कदम (41 रा. कोंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
बनावट कागदपत्राद्वारे जी. टी. एल. इन्फ्रान्स्ट्रक्चर कंपनीच्या रांजणगावातील पाचंगे वस्ती परिसरातून बंद अवस्थेतील मोबाईल टॉवरच्या चोरीची घटना 28 जानेवारी रोजी घडली होती. चोरटय़ांनी सुमारे 15 लाखांचे साहित्य चोरुन नेले होते. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून हा तपास केला जात होता. पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना कर्नाटकातून आणि पुणे जिह्यातून पाचजणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून 13 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. त्यांनी जी. टी. एल. कंपनीचे सातारा, रत्नागिरी, सांगली, पुणे, बीड, रायगड अशा 6 जिल्हयातील 10 मोबाईल टॉवरच्या साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली आहे.
अटक केलेल्या टोळीत जी.टी.एल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. 2008 मध्ये कंपनी बंद झाल्यानंतर संबंधित मोबाईल टॉवरच्या चोरीचा कट त्यांनी रचला होता.