गंभीर जखमी झालेल्या दोघांवर गोमेकॉत उपचार : पाच जणांना लूक आऊट नोटिस, काहीजण ताब्यात
मडगाव : मडगाव -कोलवा मार्गावरील मुंगूल येथे सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या एका गॅगवाँर प्रकरणात दोघेजण गंभीर जखमी झालेले असून त्यांच्यावर बांबोळी इस्पितळात उपचार चालू आहेत. फातोर्डा पोलिसांनी याप्रकरणी एकूण पाच संशयित आरोपीविरुद्ध लूक आऊट नोटिस जारी केली आहे. काही संशयिताना मंगळवारी सायंकाळपर्यंत ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी चालू आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर 3 वाजण्याच्या सुमाराला एका कारचा, हल्लेखोर एकूण चार कारने पाठलाग करीत होते. या सर्व कार कोलवाहून मडगावच्या दिशने भर वेगात जात होत्या. अखेर पाठलाग करणाऱ्या या चार कारपैकी एका कारने पुढे जात असलेल्या कारला अडविले. पुढे जात असलेल्या कारमध्ये तक्रारदारासह दोघेजण होते. चार कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी या दोघांना मुंगूलजवळ अडविले. त्यानंतर हल्लेखोरांनी तक्रारदार व त्याच्या एका मित्राला जबर मारहाण केल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. या जखमी युवकांना तेथेच सोडून हल्लेखारे चार कारमधून पळून गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काही वेळाने या घटनेची खबर फातोर्डा पोलिसांना कळताच फातोर्डा पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी जखमीना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. दरम्यान, या दोघांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांचा तपास चालू आहे. जवळपास असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन काही संशयितांची नावे पोलिसांना मिळालेली असून त्या आधारे काहीजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्यांना अटक केली नव्हती. दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाने दिलेल्या माहितीनुसार मडगाव येथील संशयित आरोपी अक्षय तलवार, राहुल तलवार, दवर्ली येथील विल्सन कार्व्हालो, रसूल (पूर्ण नाव अजून मिळालेले नाही) अशी संशयित आरोपीची नावे आहेत. हातात धोकादायक शस्त्रे घेऊन या हल्लेखोरानीं बेकायदेशीररित्या जमाव केला आणि तक्रारदार युवकेश सिंग बदैला आणि त्यांचा मित्र रफीक हे मुंगूल येथे पोचले असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी सोडा बाटल्या आणि कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे युवकेश सिंग बदैला आणि त्यांचा मित्र रफीक दोघेही गंभीररित्या जखमी झाले. तोंडावर मास्क घातलेल्या एका हल्लेखोराने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या व त्यानंतर सर्वजण पळून गेले.









