क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण : पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मडगाव : रस्त्यावर वाहन चालविताना ओव्हटेक करताना झालेल्या क्षुल्लक बाचाबाची नंतर मोहम्मद रसिद (32) या युवकाला मारहाण करण्यासाठी पाच ते सहा जणांचे ‘गँग’ थेट मडगाव आरोग्य केंद्रात घुसले. त्यांनी आरोग्य केंद्रातून घुसून त्या युवकाला जबर मारहाण केली. या युवकाच्या डोक्यावर फायर इक्स्टिंगग्विशर फेकून मारण्यात आला तसेच स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून ते ‘हिस्ट्री शीटर’ आहेत. हा गँगवॉरचा प्रकार काल बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. या हल्ल्यामुळे मडगावात खळबळ माजली आहे.
रस्त्यावरचे भांडण आरोग्यकेंद्रापर्यंत
उपलब्ध माहिती प्रमाणे जुन्या हॉस्पिसियो इस्पितळाजवळ दोन दुचाकीमध्ये ओव्हरटेक करण्यावरून दोन दुचाकी चालकांमध्ये बाचाबाची झाली. हे प्रकरण हातघाईवर गेले. तेव्हा एका चालकाने, मोहम्मद रफिक याला मारहाण करण्यासाठी आपल्या साथीदारांना बोलावले. त्याने जीव वाचविण्यासाठी जवळच्या मडगाव आरोग्य केंद्रात धाव घेतली आणि स्वत:ला एका खोलीत बंदिस्त करून घेतले. पाच-सहा जणांचे गँग मडगाव आरोग्य केंद्रात घुसले. त्यांनी खोलीत बंदिस्त करून घेतलेल्या मोहम्मद रफिकला खोलीची कडी तोडून बाहेर ओढून काढले व जबर मारहाण केली. त्याच्या डोक्यावर आरोग्य केंद्रातील फायर इक्स्टिंग्विशर फेकून मारला. तसेच स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला. त्यात हा युवक जखमी झाला.
जखमीच्या भावालाही मारहण
हा प्रकार मोहम्मदच्या भावांना कळला, तेव्हा ते मदतीसाठी आरोग्य केंद्रात पोचले, तेव्हा गँगमधील युवकांनी त्यांनाही मारहाण केली. मात्र, त्यांना किरकोळ मार लागला. दरम्यान, मोहम्मद रफिकला मारहाण करण्यात 15 ते 20 युवक गुंतल्याचा आरोप त्याच्या भावाने केला आहे. मोहम्मद रफिक याच्या बाणावली, नावेली व फातोर्डा येथे आरटीओ कार्यालयाजवळ वाहन दुरूस्ती करण्याच्या गॅरेज असल्याची माहिती देण्यात आली.









