तासगाव :
तासगाव व खानापूर तालुक्यातून ट्रॅक्टर व ट्रॉलीची चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील दोघांना बामणी व मंगरुळ (ता. खानापूर) येथून ताब्यात घेण्यात आले. तर उर्वरित दोघेजण परागंदा आहेत. या टोळीकडून पोलिसांनी सुमारे १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये तीन ट्रॉल्या, दोन ट्रॅक्टरचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिली.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये यशराज अभिजीत माळी (वय (वय १९, रा. बामणी, ता. खानापूर), सागर आप्पासो शिंदे (वय २४, रा. मंगरुळ, ता. खानापूर), सार्थक राजेंद्र भंडारे (रा. धामणी, ता. तासगाव), आदित्य सुनील निकम (रा. शिरगाव वांगी, ता. कडेगाव) यांचा समावेश आहे. यातील यशराज माळी व सागर शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीसवर सोडले आहे. उर्वरित दोघेजण परागंदा आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत माहिती अशी, हातनूर (ता. तासगाव) येथील दत्तात्रय नामदेव पवार यांच्या घराजवळून २६ एप्रिल रोजी एक डंपिंग ट्रॉली अज्ञाताने चोरून नेली होती. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या चोरीचा कसून तपास करण्याच्या सूचना पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी दिल्या होत्या.
त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथक चोरट्यांच्या मागावर होते. तपासादरम्यान, या पथकातील अमोल चव्हाण यांना गोपनीय बातमीदाराकडून चोरट्यांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, प्रशांत चव्हाण, विवेक यादव, विठ्ठल सानप, सुरेश भोसले यांनी बामणी येथून यशराज माळी व मंगरुळ येथून सागर शिंदे यांच्या मुसक्या आवळ्या. त्यांच्याकडून दोन ट्रॅक्टर, तीन ट्रॉल्या, असा सुमारे १३ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या चोरट्यांकडून खानापूर तालुक्यातील चोरीचीही उकल करण्यात आली आहे. याकामी सांगली पोलीस ठाण्यातील सायबर विभागातील अजय पाटील व अभिजीत पाटील यांची मदत तासगाव पोलीसांना मिळाली.








