वाराणसी येथील प्रकार : आरोपींची बुलेट बाइक जप्त
वृत्तसंस्था/ वाराणसी
उत्तरप्रदेशच्या वाराणसीमध्ये आयआयटी बीएचयूमध्ये छेडछाड आणि सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वाराणसी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, आनंद उर्फ अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल अशी या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून बुलेट बाइक जप्त करण्यात आली आहे. तिन्ही आरोपी हे भाजपच्या आयटी सेलचे पदाधिकारी आहेत.
आयआयटी बीएचयू परिसरात 1 नोव्हेंबर रोजी रात्री विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी प्रारंभी छेडछाडीचा गुन्हा नोंदविला होता, याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आयआयटी परिसरात अनेक दिवसापर्यंत निदर्शने केली होती. काही दिवसांनी पीडितेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बलात्काराचा गुन्हा जोडण्यात आला होता.
रात्री दीड वाजता विद्यार्थिनी स्वत:च्या मित्रासोबत परिसरात फिरत असताना बुलेटवरून तिघेजण आले आणि त्यांनी बळजबरीने विद्यार्थिनीला तेथून स्वत:सोबत नेले, विद्यार्थिनीला बंदुकीचा धाक दाखवून आरोपींनी तिला निर्वस्त्र करत त्याचे मोबाइलद्वारे चित्रिकरण केले होते. आरोपींनी बलात्काराचा प्रयत्न केला असता विद्यार्थिनी मदतीसाठी ओरडू लागली होती, यामुळे आरोपींनी तिला धमकावत तेथून पळ काढला होता. यानंतर विद्यार्थिनीने तेथून एका प्राध्यापकाच्या घरी पोहोचत त्याला घडलेला प्रकार सांगितला होता. प्राध्यापकाने तातडीने हा प्रकार वरिष्ठांना कळविला होता.
याप्रकरणी आरोपींवर कारवाई व्हावी म्हणून विद्यार्थ्यांनी अनेक दिवसांपर्यंत निदर्शने केली होती. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांसमवेत गुन्हे अन्वेषण विभागाची 4 पथके कार्यरत होती. वाराणसी पोलिसांनी अखेर रविवारी या आरोपींना जेरबंद केले आहे.









