कायदा विद्यार्थिनी दुष्कर्माची बळी : तीन आरोपींना अटक, तृणमूल काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा समावेश
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेसारखी सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. दक्षिण कोलकाता कायदा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या परिसरातच लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून अटक झालेल्यांमध्ये राज्यात सत्ताधारी असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. काही महिन्यांपूर्वी याच शहरातील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करणाऱ्या एका डॉक्टर विद्यार्थिनीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. देशभर ते प्रकरण गाजले होते. त्या प्रकरणातील आरोपीला शिक्षाही झाली आहे. या प्रकरणाची आठवण करून देणारे हे नवे प्रकरण आता घडले आहे.
25 जूनची घटना
कोलकाता येथील दक्षिण कोलकाता महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाला असून ही घटना 25 जूनच्या रात्री घडली. या विद्यार्थिनीने या संबंधीची तक्रार कसबा पोलीस स्थानकात सादर केली आहे. तिच्या तक्रारीवरुन तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची नावे झैब अहमद (वय 19), मनोज मिश्रा (वय 31) आणि प्रमीत मुखोपाध्याय (वय 20) अशी आहेत.
पोलीस कोठडीत पाठवणी
या आरोपींना अलिपूर न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने तिघांचीही पाठवणी 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे. पुढील तपास कोलकाता पोलीस करीत आहेत. एक आरोपी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे, तर दोन आरोपी महाविद्यालयाच्या कर्मचारी वर्गातील असल्याची माहिती देण्यात आली. लवकरात लवकर या प्रकणाचा छडा लावण्यात येईल, असे प्रतिपादन पोलिसांनी केले आहे. महाविद्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
लग्नाला नकार दिल्यामुळे?
या प्रकरणातील पीडित विद्यार्थिनीने एका आरोपीशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सूड भावनेने हे दुष्कर्म करण्यात आले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तथापि, यासंबंधी निश्चित माहिती तपास पूर्ण होऊन हे प्रकरण न्यायालयात उभे राहिल्यानंतरच दिली जाणार आहे. या गुन्ह्यामागे हे एकच कारण आहे, की अन्य कारणे आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
भाजपचा सरकारवर आरोप
महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थिनी सुरक्षित नसतील, तर या राज्यात इतरत्र महिलांची स्थिती काय असेल, हे वेगळे सांगावयास नको, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्ताकाळात पश्चिम बंगाल राज्य महिलांविरोधातील गंभीर गुन्ह्यांचे केंद्र बनले आहे. बलात्कार ही तर नित्याचीच बाब झाली आहे. आर. जी. कर महाविद्यालयातील त्या भयंकर प्रकाराच्या आठवणी आजही ताज्या असताना हे नवे प्रकरण समोर आले आहे. दोन्ही प्रकरणांमधील आरोपी राज्यातील सत्ताधाऱ्यांशी संबंधितच आहेत, हा योगायोग नव्हे. राज्यातील सत्ताधाऱ्यांचे गुन्हेगारांना पाठबळ असल्याचेच यातून दिसून येते. ममता बॅनर्जी या महिलेच्या हाती राज्याची सूत्रे असतानाही हे राज्य महिलांसाठी एक दु:स्वप्न बनावे, ही खरोखरच लज्जास्पद बाब आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली. राज्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही कायदा सुव्यवस्था प्रश्नी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.









