कराड :
सातारा जिह्यातील कराड तालुक्यात सतत गुन्हेगारी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर अखेर पोलिसांनी कठोर कारवाई करत तीन आरोपींना दोन वर्षांसाठी सातारा व सांगली जिह्याच्या हद्दीबाहेर तडीपार केले आहे. या कारवाईमुळे कराड तालुक्यातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
सदर टोळीतील प्रमुख आरोपी रितेश सर्जेराव घारे (वय 22, रा. घारेवाडी, ता. कराड) याच्यासह टोळीतील सदस्य शिवराज महादेव कुंभार (वय 29, रा. शुक्रवार पेठ, कराड) व संग्राम अशोक पवार (वय 23, रा. बालाजी कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर) यांच्यावर दरोडा, खुनाचा प्रयत्न, जमाव जमवून मारहाण, गंभीर दुखापत, शिवीगाळ व दमदाटी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. या सर्वांनी कराड तालुका व शहर पोलीस ठाणे हद्दीत अनेक गुह्यांमध्ये सहभाग घेतला होता.
कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अंतर्गत तडीपारीची शिफारस हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केली होती. यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी चौकशी करून अहवाल दिला. त्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या तिन्ही गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी सातारा व सांगली जिह्याच्या हद्दीबाहेर तडीपार करण्याचा आदेश दिला.
या कारवाईसाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, कॉन्स्टेबल अनुराधा सणस, तालुका पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे व किरण बामणे यांनी योग्य पुरावे सादर करून महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी वेळोवेळी अटक व प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हेगारीच्या प्रवृत्तीत बदल करत नव्हते. त्यांच्या गुन्हेगारीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे सामान्य जनतेमधून सातत्याने कडक कारवाईची मागणी केली जात होती.
सातारा जिह्यातील शांतता व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अशा सराईत गुन्हेगारांविरुद्ध तडीपार, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.








