भुईज :
येथील धोम पुनर्वसनमध्ये मध्यरात्री घरात घुसून घरातील तब्बल पावणे लाखांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांच्या आवाजाने जागे झालेल्या पोळ कुटुंबांची अक्षरश: भंबेरी उडाली. परंतु चोरटे चोरी करून पळून जाण्यात यशस्वी झाले. याबाबत भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महामार्गावरील जोशीविहीर नजीक असलेल्या धोम पुर्नवसन येथील राहुल शिवाजी पोळ यांच्या राहत्या घरात दि. 5 रोजी मध्यरात्री अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी कडी काढून त्यांच्या घरात प्रवेश केला आणि लाकडी कपाटातील लॉकरमधील स्टीलच्या डब्यातील सोन्याचे 1 लाख 81 हजार 500 रूपयाचे दागिने घेवून पळून गेले.
या दरम्यान कपाटाच्या झालेल्या आवाजाने जागे झालेले पोळ कुटुंबीय आराडाओरडा करत मदतीसाठी हाका मारत होते. त्यांच्यासमोर अज्ञात पाच जण काळी कपडे परिधान केलेले निघून गेले. परंतु शेजाऱ्यांच्याही घरांना बाहेरून कडी लावल्याने कोणालाही इच्छा असूनही मदतीसाठी येता आले नाही.
घडलेल्या प्रकारानंतर पोळ कुटुंबीयांनी भुईंज पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर भुईंजचे सपोनि रमेश गर्जे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून तपासासाठी सूचना केल्या तर घरात पडलेले अस्ताव्यस्त साहित्य व ठसे तज्ञ यांना बोलावून तपासासाठी पथक रवाना करण्यात आले. यावेळी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी घटनास्थळी भेट देवून मार्गदर्शनपर सूचना केल्या. पुढील तपास भुईजचे सपोनि रमेश गर्जे हे करीत आहेत.
चेनस्नॅचिंगच्याही घटना वाढू लागल्या
गेले दोन तीन दिवस पहाटे फिरायला जाणाऱ्या महिलांना अज्ञातांच्याकडून धमकावून सोने लुटण्याचा घटना पाचवड बसस्थानक ते शेवाळे वस्ती या दरम्यान व भुईंज बसस्थानक ते चिंधवली रस्ता व महामार्गावर होत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.








