पुणे / वार्ताहर :
आंध्रप्रदेश, तेलंगणा येथून पुण्यात येऊन बसमधील गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलिसांना यश आले. पोलिसांनी चार आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 2.10 लाख रुपये किंमतीचे 12 मोबाईल हस्तगत केल्याची माहिती दिली.
सतीश व्यंकटेश माधगोलू (वय 22, रा. उपलपेटा, हैदराबाद, तेलगंणा), जगदीश भास्करराव आवला (22, रा. पारथीपुरम, आंध्रप्रदेश), विक्रम शिवनाथ दास (22, रा. हैदराबाद, तेलंगणा), गणेश कृष्णा गोड (22, रा.बहारा, महासमुंद, छत्तीसगड) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांचा चुलत भाऊ 5 ऑगस्ट रोजी घरी जाण्यासाठी अलंकार चौकाजवळील पीएमटी बसस्टॉपवरुन केशवनगर येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या शर्टाच्या खिशात ठेवलेला दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन चोरुन नेला. याबाबत बंडगार्डन पोलीस चौकशी करताना, पोलीस अंमलदार मनोज भोकरे व शिवाजी सरक यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, पुणे एसटी स्टॅण्डसमोर अंडाभुर्जीच्या गाडीजवळ चार जण थांबले असून ते मोबाईल विक्री करण्याबाबत विचारणा करत आहेत. त्यांच्याजवळ चोरीचे मोबाईल फोन आहेत. माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत 12 मोबाईल फोन मिळून आले असून, त्यांनी ते पुणे शहरातून विविध ठिकाणी पीएमपीएमएल बसमधून चोरी केल्याचे सांगितले.









