‘तरुण भारत’ वृत्ताची दखल : 15-17 रोजी धावणार एक्स्प्रेस
► प्रतिनिधी/ बेळगाव
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नैऋत्य रेल्वेने यशवंतपूर-बेळगाव या मार्गावर दोन रेल्वेफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बेंगळूरस्थित नागरिकांना बेळगावमध्ये गणेशोत्सवासाठी येता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. ‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल घेत नागरिकांच्या सोयीसाठी एक्स्प्रेस सुरू केल्याने गणेशभक्तांचा गणेशोत्सव आनंदात साजरा होणार आहे.
यशवंतपूर-बेळगाव 07389 व 07391 एक्स्प्रेस शुक्रवार दि. 15 व रविवार दि. 17 रोजी धावणार आहे. रात्री सायंकाळी 6.15 वा. यशवंतपूर येथून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 6.00 वा. बेळगावला पोहोचेल. तर बेळगाव -यशवंतपूर 07390 व 07392 एक्स्पे्रस शनिवार दि. 16 व सोमवार 18 रोजी धावेल. सायं. 5.30 वा. बेळगावमधून निघालेली एक्स्प्रेस दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वा. बेंगळूरला पोहोचेल. या एक्स्प्रेसला एकूण 18 डबे जोडण्यात आले आहेत.
‘तरुण भारत’ने प्रवाशांच्या सोयीसाठी बेंगळूर-बेळगाव व मुंबई-बेळगाव या मार्गावर गणेशोत्सव स्पेशल एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. याची दखल घेत राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी रेल्वेमंत्री व नैर्त्रुत्य रेल्वेला पत्र पाठवून गणेशोत्सव स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. सध्या बेंगळूरहून बेळगावला येणाऱ्या एक्स्प्रेस गणेशोत्सव काळात फुल्ल असल्यामुळे उत्सव स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी करण्यात आली होती.
याची दखल घेत नैर्त्रुत्य रेल्वेने बेंगळूर-बेळगाव मार्गावर गणेशोत्सव स्पेशल रेल्वेची घोषणा केली आहे. या स्पेशल रेल्वेचे बुकिंगही सुरू केले असून खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मनमानीला यामुळे चाप बसणार आहे. अवघ्या 400 ते 500 रुपयांमध्ये बेंगळूरहून नागरिक बेळगावला गणेशोत्सवासाठी पोहोचणार आहेत.
मुंबई-बेळगाव रेल्वेकडे दुर्लक्षच
बेळगावमधील शेकडो नागरिक व्यवसाय, नोकरीनिमित्त मुंबई, पुणे येथे आहेत. गणेशोत्सवाच्या काळात बरेचजण बेळगावला परततात. एकीकडे कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जादा फेरी सुरू केली असताना दुसरीकडे नैऋत्य रेल्वे मात्र मुंबई-बेळगाव मार्गावर गणेशोत्सव स्पेशल रेल्वे सोडण्याकडे दुर्लक्ष केले आहे. नैऋत्य रेल्वेने यशवंतपूर-बेळगाव एक्स्प्रेसची घोषणा केली. परंतु मुंबई-बेळगाव एक्स्प्रेस सुरू करण्याकडे अनास्था दिसून येत आहे.









