एक खिडकीमध्ये अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सव काळात मंडळांना हेस्कॉमकडून वीज पुरवठा केला जातो. हेस्कॉमने आपले दरपत्र किलो वॅटनुसार तयार केले आहे. मंडळांना त्यांच्या गरजेनुसार टेम्पररी मिटर दिला जाणार आहे. गणेशोत्सव मंडळाच्या आवारातील पोलिस स्थानकात मिटर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरात लवकर मंडळाने आवश्यक कागदपत्रे देऊन मिटर घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव शहर व उपनगरात 370 हून अधिक लहान मोठी गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सव काळात मंडळांना विज पुरवठा करण्यासाठी टेम्पररी मिटर दिला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मीटर देण्यासाठी हेस्कॉमने यंत्रणा तयार केली आहे. 1 ते 10 किलो वॅटपर्यंत विद्युत मीटर दिला जाणार आहे. काही मंडळे मोठा देखावा तसेच भव्य दिव्य विद्युत रोषणाई करतात. अशा मंडळांना जास्त किलो वॅट क्षमतेचा विज पुरवठा घ्यावा लागतो.
ए. एम. शिंदे (सहाय्यक कार्यकारी अभियंता)
हेस्कॉमकडून गणेशोत्सवासाठी मंडळांना टेम्पररी विज पुरवठा केला जाणार आहे. यासाठी दरपत्रक निश्चित करण्यात आले असून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी जवळच्या पोलिस स्थानकात सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी कार्यालयात जाऊन कागदपत्राची पूर्तता करायची आहे.
गणेश मंडळांच्या मागणीकडे दुर्लक्ष
कर्नाटक सरकारने गृहज्योती योजनेंतर्गत घरगुती मिटरचे बिल शून्य रुपये केले आहे. याचप्रमाणे बेळगावमधील गणेशोत्सव मंडळांची विद्युत बिले शून्य करण्याची मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, शहापूर गणेशोत्सव महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे केली. परंतु शहरात 370 हून अधिक गणेशोत्सव मंडळ असल्याने हा खर्च परवडणारा नसल्याने हेस्कॉम प्रशासनाने या मागणीवर विचार केलेला दिसत नाही. यामुळे गणेशोत्सव मंडळांना विजेचे बिल भरावेच लागणार आहे.
हेस्कॉमने निश्चित केलेले दरपत्रक
किलो वॅट डिपॉझिट सर्व्हिस चार्ज व जीएसटी एकूण
1 किलो वॅट 1470 50+10 1530
2 किलो वॅट 2940 50+10 3000
3 किलो वॅट 4410 50+10 4470
4 किलो वॅट 5880 50+10 5940
5 किलो वॅट 7350 50+10 7410
6 किलो वॅट 8820 50+10 8880
7 किलो वॅट 10290 50+10 10350
8 किलो वॅट 11760 50+10 11820
9 किलो वॅट 13230 50+10 13290
10 किलो वॅट 14700 50+10 14760









