ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कोरोनाकाळानंतर यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. त्यासाठी प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. विशेषतः गणपती मंडळांसह भाविकांना जल्लोष करण्यासाठी पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरवर्षी गणपती मंडळांना घ्याव्या लागणाऱ्या विविध परवानग्या आता 5 वर्षातून एकदा घ्याव्या लागणार आहेत. महापालिका मंडप शुल्क माफ केले आहे. त्याशिवाय एक खिडकी योजनेंतर्गत सर्व परवानग्या देण्यात येत आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पोलीस आयुक्तालयात आयोजित गणेशोत्सव पदाधिकारी बैठकीत शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, कोरोनामुळे मागील दोन वर्षे विविध उत्सवाला बाधा निर्माण झाली होती. आता मात्र, कोरोना संपुष्टात आला असून सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडीबाबत निर्बंध हटविण्यात आले आहेत. प्रामुख्याने गणपती मूर्तीची उंचीचे बंधन नाही. एक खिडकीद्वारे विविध परवानगी देण्यात येत आहेत. त्याचसोबत मंडप शुल्क माफ, वीज मीटर परवानगीबाबत जिल्हाधिकारी यांनी मंडळांना सहकार्य करण्याची सूचना त्यांनी केली. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत दुसऱ्या दिवशी सकाळी सहानंतर मंडळांना पारंपरिक वाद्य वाजवू द्यावेत, पोलिसांना कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उत्सवात नागरिकांना त्रास होणार नाही, याची मंडळांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार