गणेशोत्सव पंधरा दिवसांवर : गणेशमूर्ती तयार करण्यात अन् शेवटचा हात फिरविण्यात मूर्तिकार दंग
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपल्याने गणेश मूर्तिकारांच्या हाताला वेग येऊ लागला आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील कार्यशाळांमध्येही गणेशमूर्तींची लगबग दिसत आहे. सार्वजनिक मूर्तींबरोबर घरगुती गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकार दंग झाले आहेत. आता कार्यशाळांमध्ये रंगकाम व सजावटीसाठी कारागिरांचे हात धडपडू लागले आहेत. ग्रामीण भागात दरवर्षी कारागिरांकडून हजारो मूर्ती आकार घेतात. तालुक्यात साधारण अंदाजे 450 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. शिवाय अलीकडे घरगुती गणेशमूर्तींची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे कार्यशाळेत गणेश मूर्ती बुकिंगसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. वेगवेगळ्या आकार व प्रतिमांमध्ये मूर्ती साकारु लागल्या आहेत. त्यामुळे कार्यशाळा बहरताना दिसून येत आहेत. विभक्त कुटुंबांची संख्या वाढल्याने घरगुती मूर्तींच्या संख्येत भर पडली आहे. त्यामुळे घरगुती मूर्तींची संख्यादेखील वाढली आहे. विशेषत: केदनूर, मण्णीकेरी, हंदिगनूर, अतिवाड, बसुर्ते, बेकिनकेरे, कुद्रेमनी आदी भागात गणेशमूर्तींना आकार दिला जात आहे. शेडूची माती आणि इतर साहित्यापासून आकर्षक, सुबक मूर्ती घडू लागल्या आहेत. विशेषत: गणेशोत्सव जवळ आल्याने शेवटच्या टप्प्यातील रंगकाम आणि सजावट होऊ लागली आहे.
बाहेरुन येणाऱ्या मूर्तींमुळे फटका
अलीकडच्या काही वर्षात ग्रामीण भागात बाहेरुन विक्रीस येणाऱ्या गणेशमूर्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे स्थानिक मूर्तिकारांना त्याचा फटका बसू लागला आहे. काही गावांमध्ये गणेश मूर्तिकार टिकून असले तरी बाहेरुन मूर्ती आणल्या जात असल्याने स्थानिक मूर्तिकार अडचणीत येऊ लागले आहेत. काही गावामध्ये पुंभार कारागीर पारंपरिक पद्धतीने आपला व्यवसाय टिकवून असले तरी कोल्हापूर आणि इतर ठिकाणाहून मूर्ती मोठ्या प्रमाणात येत असल्याने स्थानिक मूर्तिकारांच्या कलेला धोका निर्माण झाला आहे.
प्रदूषण रोखणे आवश्यक
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती अधिक असल्यामुळे प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज व्यक्त होऊ लागली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे विहीर, तलाव आणि नाल्यातील पाणी दूषित होत आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा पायंडा घालणे आवश्यक आहे. गणेशोत्सव काळात जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होत असून या समस्येवर मार्ग काढणे आवश्यक आहे.
शेवटच्या टप्प्यातील रंगकामाची लगबग
गणेशमूर्ती तयार करणे हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. यंदा 10 हून अधिक सार्वजनिक आणि पंधराशेहून अधिक घरगुती गणेश मूर्ती तयार केल्या आहेत. शेवटच्या टप्प्यातील रंग आणि कोरीव कामासाठी लगबग सुरू आहे. शाडूच्या मूर्तीना अधिक वेळ लागतो. शिवाय या मूर्ती बनविल्या तरी ग्राहकांचा कल पीओपी मूर्तीकडेच आहे.
– शट्टू लोहार (गणेश मूर्तिकार, केदनूर)









