भक्तीपूर्ण वातावरणात गणेश उत्सव साजरा करण्याची तयारी कोल्हापूरकरांनी केली आहे
कोल्हापूर : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात कोल्हापूरकर आघाडीवर आहेत. मूर्ती आणि निर्माल्य दान करण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. यावर्षी रात्री 12 नंतर मिरवणुकीत वाद्ये वाजणार नाहीत. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणेश उत्सव साजरा करण्याची तयारी कोल्हापूरकरांनी केली आहे.
यंदाही कोल्हापूकरकर पर्यावरणपूरक उत्सवाची साद घालत असल्याचे संकेत मंगळवारी ‘तरुण भारत संवाद’च्या चर्चासत्रातून मिळाले.या चर्चासत्रात पोलीस उपअधीक्षक तानाजी सांवत, महापालिका उपायुक्त कपिल जगताप, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राम्बरे, निसर्ग मित्र संघटनेचे अनिल चौगुले, दयावान ग्रुपचे प्रताप देसाई, संजय मेहतर, लेटेस्ट तरुण मंडळाचे गजानन यादव, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाचे अमर बागल, अजित सासणे आणि जयेंद्र भोसले, मित्रप्रेम मंडळाचे शिवाजी जाधव, मित्राय फाऊंडेशनचे स्वप्निल यादव आणि केवल भांबुरे, श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सहभाग घेतला.
5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी
गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या काळामध्ये 5 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत साऊंडला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये 27 ऑगस्टला गणेश आगमनाचा दिवस. गणेशोत्सवातील इतर सहा दिवस (2 सप्टेंबर), आठवा (4 सप्टेंबर), नववा दिवस (5 सप्टेंबर) आणि शेवटचा म्हणजेच गणेश विसर्जनाचा (6 सप्टेंबर) या पाच दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत साऊंडला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रात्री 12 नंतर साऊंड बंद राहणार आहे.
190 विसर्जन कुंडाची व्यवस्था
दरवर्षीप्रमाणे यंदाही आगमन आणि विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेकडून तयारी सुरू आहे. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहरात ठिकठिकाणी 190 कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत. दान केलेल्या गणेशमूर्तींचे संकलन करण्यासाठी लवकरच वाहतूक टेंडर काढण्यात येणार आहे. यासाठी केएमटी कर्मचारी, मनपा शिक्षक, मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिली जाणार आहे.
27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान लेसर बंदी
लेसरमुळे डोळ्यासह मोबाईलही खराब झाल्याचे गेल्या 2 विसर्जन मिरवणुकीतून समोर आले आहे. 4 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर या कालावधीमध्ये लेसरवर बंदीचा आदेश लागू केला आहे. कोल्हापूरचा गणेशोत्सव हा नेहमीच दिशादर्शक ठरतो, यंदाही सार्वजनिक तरुण मंडळांनी लेसरचा वापर टाळून आदर्श निर्माण करावा असे आवाहन गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी केले.
यंदाही लकी ड्रॉ
राजारामपुरी येथील आगमन मिरवणुकीकडे संपूर्ण जिह्याचे लक्ष लागून राहिलेले असते. राजारामपुरी येथे आगमन मिरवणुकीमध्ये मंडळांची मोठी ईर्ष्या असते. यंदाही राजारामपुरी पोलीस ठाण्याच्यावतीने आगमन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला मंडळांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. याचप्रमाणे मंडळांना मिरवणुकीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.
पोलीस अधीक्षक घेणार बैठक
कोल्हापूर शहरातील सार्वजनिक तरुण मंडळांची आढावा बैठक पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता हे घेणार आहेत. यामध्ये मंडळांना आगमन आणि विसर्जनावेळी येणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज
- पंचगंगा प्रदूषणमुक्ती आणि जिल्ह्यातील जलस्त्राsत प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी वर्ष 2015 पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव या उपक्रमाला जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत सुरूवात करण्यात आलेली आहे.
- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, कोल्हापूर अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. सन 2015-2024 या दहा वर्षामध्ये या उपक्रमाला लोकांचा चांगला व वाढता प्रतिसाद मिळाला आहे.
- या उपक्रमांतर्गत सन 2015 ते 2024 या 10 वर्षाच्या कालावधीत तब्बल 2502834 इतक्या गणेशमूर्ती तर 12,381 ट्रॉली व 2200 घंटागाडी निर्माल्य नदीत जाण्यापासून रोखणेस जिल्हा परिषदेस यश मिळाले आहे.
- सन 2024 मध्ये तब्बल 292486 गणेशमूतांचे संकलन करण्यात आले. तर 230 घंटागाडी व 1392 ट्रॉलींच्या सहाय्याने 5 टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
87 लाखांचा खर्च अपेक्षित
“गणेशोत्सव तयारीसाठी महापालिकेकडून विविध कामांसाठी 87 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये इराणी खणीतील गाळ काढण्यासाठी 35 लाख रूपये, मूर्ती वाहतूक व हमाल टेंडरसाठी 22 लाख रूपये, रस्ते, लाईट व मंडप उभारणीसाठी 10 लाख व इतर कामासाठी 10 ते 15 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.”
तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची व्यवस्था
“गणेशोत्सव विसर्जन ठिकाणी 24 तास कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. नागरिक व सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता महापालिकेकडून घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी तीन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.”
आदर्श गणेशोत्सव साजरा करावा
“कोल्हापुरातील गणेशोत्सव म्हंटले की, पहिले नाव डोळ्यासमोर येते ते अंबाबाई मंदिरातील मानाच्या खजिन्यावरच्या गणपतीचे. तब्बल 135 वर्षांची परंपरा असलेल्या या मानाच्या गणपतीचा उत्सव श्री महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे पर्यावरणपूरक साजरा केला जातो. गणेशोत्सवातील सर्व विधी पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने केले जातात. हा उत्सव साजरा करताना आम्ही लोकांच्या आरोग्याचा विचार करत सर्व मंडळानी सुद्धा अवलंबून आदर्श असा गणेशोत्सव साजरा करावा.”
– राजू मेवेकरी, अध्यक्ष, श्री महालक्ष्मी भक्त मंडळ.
पर्यावरणपूरकतेसाठी सर्वांच्या सहकार्याची गरज
“पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी यंदा राज्य शासनाने नवीन सूचना आणि नियमावली जाहीर केली आहे. शासनाच्या सूचनेनुसारच गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेकडून जय्यत तयारी सुरू आहे. प्राथमिक स्वरूपात पर्यावरणपूरक विसर्जनासाठी इराणी खण सज्ज करण्यात आली आहे. तीन महिन्यापूर्वीच इराणी खणीची स्वच्छता करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणशोत्सव शांततेत, पर्यावरणपूरक व विधायकतेने पार पडावा, यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.”
– कपिल जगताप, उपायुक्त, कोल्हापूर महापालिका.
12 वाजता बंद म्हणजे बंदच…
“रात्री 12 वाजता साऊंड सिस्टीम बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याचे पालन करणे पोलीस प्रशासनास बंधनकारक आहे. त्यामुळे रात्री 12 वाजता साऊंड बंद करुन सार्वजनिक तरुण मंडळांनी सहकार्य करावे,असे आवाहन गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांनी केले.“
यंदाचा गणेशोत्सव दिशादर्शक ठरावा
“या वर्षीचा गणपती उत्सव प्रशासनाला दिशादर्शक ठरावा. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. गणेशोत्सोव विधायक कसा होईल, याची सर्व मंडळानी जबाबदारी घेतली पाहिजे. गणेशोत्सोवामध्ये आपण जवळपास 74 प्रकारच्या वनस्पती वापरतो त्या तलावामध्ये अथवा नदीमध्ये फेकून न देता त्याचा पुर्नवापर केला पाहिजे. गणपतीच्या मुखवटयाला सोनेरी रंग लावला जातो तो सर्वात हानिकारक आहे. हा रंग वापरणे अयोग्य असून यासाठी कुंभार समाजाचे प्रबोधन केले पाहिजे.”
– अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्गमित्र संस्था.
सामाजिक प्रबोधनासाठी शासनाच्या सहकार्याची गरज
“राज्य सरकारने गणेश चतुर्थी हा सण आता राज्याचा महोत्सव म्हणून घोषित केला आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडून मंडळांच्या सामाजिक प्रबोधन देखाव्यासाठी देण्यात येणाऱ्या बक्षिसाची पूर्तंता करण्यात आलेली नाही. आमच्या मंडळाकडून वर्षंभर विविध सामाजिक,धार्मिक उपक्रम राबवले जात आहे. आपल्या मंडळाकडून गणेश विसर्जन शांततेने व पारंपरिक वाद्याचा वापराने केले जाते. याचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा. मूर्ती दानसाठी महापालिका प्रशासनाची यंत्रणा ही अधिक सक्षम करावी.”
– गजानन यादव, अध्यक्ष, लेटेस्ट तरूण मंडळ.
वर्तमानावर आधारित देखाव्यांची मांडणी असावी
“गणेशोत्सवात प्रशासनाचे मंडळांना आणि मंडळांचे प्रशासनाला सहकार्य असणे जऊरीचे आहे. दोघांनीही सहकार्याची भावना ठेवली तर गणेशोत्सवाला एक चांगले वळण निश्चित लागेल. काही मंडळे अश्लिल संवादाचे देखावे करतात. देवाधर्माच्या गणेशोत्सवात हे अजिबात अभिप्रेत नाही. लोकांनाही ते आवडत नाही. मंडळांनी वर्तमानाचा विचार कऊन सजिव देखाव्यांचा मांडणी केल्यास समाजाला त्यातून बोध मिळत राहील.”
– स्वप्नील यादव, मित्राय फाऊंडेशन.
समाजात चांगले विचार रुजवण्याचा प्रयत्न
“तरुण पिढी वाचन संस्कृतीपासून दूर जात आहे. त्यांना पुन्हा वाचन चळवळीत आणण्यासाठी यंदाचा गणेशोत्सव आम्ही वाचाल तर वाचाल या ब्रीद वाक्याखाली साजरा करणार आहोत. यावर्षी मूर्तीपासून सर्वत्र पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. व्याख्याने, हरित उपक्रम, भजन, कीर्तन, वाचन स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजात चांगले विचार रुजवण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
– प्रताप देसाई, दयावान ग्रुप, शिवाजी पेठ.
मंडळाकडून वर्णगी मागितली जात नाही
“मंडळाच्या श्री च्या म़ूर्तीचे दर्शन घेण्यासाठी जे भाविक येतात. त्यांच्याकडून श्रींच्या चरणी जी देणगी अर्पण केली जाते. त्या देणगीतून मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो आहे. तसेच मंडळाची सव्वासात फुटी उंचीची शाडूची शाडूची मूर्ती असते. त्याचबरोबर आमचे मंडळ पारंपरिक व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करते. मंडळाकडून श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुमारे 2 हजार 100 झाडाची रोपाचे वाटप केले जाते. रक्तदान शिबिर देखील आयोजित केले जाते.”
– अमर बागल, संचालक, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ.
मिरवणुकीतील बीभत्स गाणी गणेशोत्सवाला अशोभनीय…
“सार्वजनिक मंडळांनी गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी. पारंपरिक वाद्यांना मिरवणुकीत स्थान देण्यावरही भर दिल्यास वादाचे अनेक प्रश्न सुटतील. शिवाय वादकांना उदरनिर्वाहासाठी चार पैसेसुद्धा मिळून जातील. मिरवणुकीतील आपल्या साऊंड सिस्टीमवर बीभत्स गाणी वाजत असतात. यंदाच्या गणेशोत्सवात अशी गाणी वाजू नयेत. देखावे करताना मित्रप्रेम मंडळाने समाजाला संदेश मिळेल असेच देखावे केलेले आहेत.”
– शिवाजीराव जाधव, संस्थापक अध्यक्ष, मित्रप्रेम मंडळ.
गणेशोत्सव शांततेत साजरा करावा
“गणेश आगमन, विसर्जन मिरवणुकीसह देखावे पाहण्यासाठी जिह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक शहरात येत असतात. यामध्ये वृद्ध, महिला, लहान मुलेही मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी जशी पोलीस प्रशासनाची आहे. त्याच पद्धतीने मंडळांचाही आहे. पोलीस कधीही मंडळांवर जबरदस्ती करुन कायदा राबवत नसतात, मात्र न्यायायलयाच्या आदेशाचे पालन करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. यामुळे यंदाही रात्री 12 वाजता साऊंड सिस्टीम बंद करुन मंडळांनी सहकार्य करावे. मंडळांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करावा..”
– तानाजी सावंत, पोलीस उपअधीक्षक.
विसर्जनाचे कोल्हापूर रोड मॉडेल
“स्थानिक स्वराज्य संस्थांनी विसर्जनासाठी कृत्रिम कुंड करावेत. जेणेकरुन कृत्रिम पाण्याचे स्त्राsत असलेले नदी तलाव, विहीर याठिकाणी थेट विसर्जन होणार नाही. त्यामुळे गणेश विसर्जन हे कृत्रिम कुंडातच होईल. पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे विसर्जन व्यवस्था आहे. तिथे करावी, जशी आपल्याकडे इराणी खण आहेत. तरीही महानगरपालिकेकडून शहरात 160 कुंड तयार केले जातात. तर सार्वजनिक गणेश मंडळ आपल्या दारात कुंड ठेवतात.”
– समीर व्याघ्राबरे, पर्यावरण अधिकारी, कोल्हापूर महानगरपालिका.








