गणेशोत्सवामध्ये पुलगल्ली तालीम मंडळाची वनराज गणेशमूर्ती चर्चेची ठरली
कोल्हापूर : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दहा दिवसांच्या पूजेअर्चेनंतर शनिवारी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी अनेक तालीम, मंडळांनी भव्य असे नियोजन केले होते. सकाळी 9 वाजता प्रथम मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणेशमूर्तीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते पूजन करुन मिरवणुकीला सुरुवात झाली.
मिरवणुकीत ढोल–ताशाचा गजर, झांजपथक, लेझीम, धनगरी ढोल, बेंजो अशा पारंपरिक वाद्यांसह ऑपरेशन सिंदुर, पर्यावरण संवर्धन, कोल्हापुरी फुटबॉल, रस्त्यांवरील खड्डे, विठुनामाचा गजर, जग्गनाथाचा रथ असे देखावे आकर्षण ठरले.
पुलगल्लीचा ‘वनराज’ आकर्षण
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये पुलगल्ली तालीम मंडळाची वनराज गणेशमूर्ती चर्चेची ठरली. विसर्जन मिरवणुकीत ही भव्य गणेशमूर्ती आकर्षण ठरली. वडाच्या पारंब्या अंगावर सोडलेली ही गणेशमूर्ती पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी झाली होती. इराणी खण येथे ही गणेशमूर्ती विसर्जन करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
‘स्वराज्य’ची स्वामी समर्थ रुपातील गणेशमूर्ती
सुभाषनगर येथील स्वराज्य ग्रुपची स्वामी समर्थ रुपातील 21 फुटी बैठी गणेशमूर्तीही मिरवणुकीचे आकर्षण ठरली. ही देखणी मूर्ती विसर्जन मिरवणुकीत दाखल झाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती.
मधूरिमाराजेंनी धरली लेझीमची चाल
मधूरिमाराजे छत्रपती यांनी सकाळच्या सत्रात मिरवणुकीमधील तालीम मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत फुगडीचा फेरा धरला. तसेच अमर तरुण मंडळात लेझीमची चाल धरली.
यंदाही पंचगंगा नदीत विसर्जन नाहीच
पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जन करण्यास प्रशासनाने बंदी घालण्याच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन झाले. महापालिका व पोलीस प्रशासनाने गंगावेस येथून पंचगंगा नदीकडे जाणारा मार्ग बंद केले होता. तसेच नदीवर बॅ रिकेट्स लावले होते. मंडळांनीही प्रतिसाद देत पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जित न करण्याला पसंती दिली.
कोल्हापूर : 151 वर्षाची परंपरा असलेल्या मानाचा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या उद्घाटनाने शहराच्या गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी नऊ वाजता शाहू मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत, मानाच्या गणेश मूर्तीचे व पालखीचे धार्मिक पूजन करण्यात आले.
खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज पाटील यांनी मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरां च्या उपस्थितीत ही पालखी मार्गस्थ झाली. बेळगावहून आणलेल्या तांत्रिक हत्तीवर राजषी शाहू महाराज यांच्या पोशाखामध्ये कार्यकर्ता स्थानापन्न झाला होता.
यावेळी खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, आयुक्त के मंजू लक्ष्मी, आनंदराव पायमल, चंद्रकांत देसाई,शेखर चौगुले, मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पोवार, उपाध्यक्ष संदीप चौगुले, खजिनदार किरण अतिग्रे, उत्सव समिती अध्यक्ष अक्षय मेथे, निखिल बोडके अवधूत टिपुगडे, कृष्णात बोडके, किशोर टिपकडे, विनायक देसाई, भूषण पाटील, प्रकाश टिपू गडे, राष्ट्रवादीचे आर के पवार, शिवसेना उबाटाचे विजय देवणे, आप चे संदीप देसाई, एडवोकेट प्रमोद दाभाडे, किशोर घाडगे,एडवोकेट धनंजय पठाडे,लाला गायकवाड, विनायक फाळके, किसन कल्याणकर कार्यकर्ते सहभागी झाले होते
माईक काढून घेण्याच्या सुचना
बारा पर्यंत साऊंड ची परवानगी असल्याने पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सर्व मंडळांच्या साऊंड बरोबर च पोलीस दलाचा स्पिकर ही बंद केला. मात्र त्यानंतर ही काही पक्षाच्या स्वागत कमानीतून येणाऱ्या गणेश मंडळाचे माईक वरुन स्वागत करण्यात येत होते. हे पाहून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अजून कोणाचा माईक चालु आहे. असे म्हणताच पोलीस अधीक्षकांनी कोणाचे माईक चालु आहेत. ते जप्त करा असे सागितले.
मालोजीराजे चा ठेका
गणेश विसर्जन मिरवणुकीला 10 वा प्रारंभ झाल्यानंतर सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळे मुख्य मिरवणूक मार्गावरती यायला सुरूवात झाली. यावेळी पाटाकडील तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचे उद्घाटन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते झाले. या वेळी मालोजीराजे यांनी साउंड सिस्टमच्या तालावर ठेका धरला.
जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष घड्याळात
विसर्जन मिरवणुकीमध्ये साऊंड सिस्टीमसाठी रात्री बाराची वेळ ठरवून दिली असल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे व पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता हे वारंवार घड्याळ बघत होते. तर जिल्हाधिकारी येडगे हे पावणेबारापासून मोबाईलमधील घड्याळाकडे लक्ष ठेवून होते. त्यांनी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांलाच पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांना साऊंड बंद करण्याच्या सूचना दिल्या.








