50 वर्षांपासून गावात ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा गावकऱ्यांनी कायम ठेवलीये
By : अबिद मोकाशी
पन्हाळा : सध्या गल्लोगल्ली अमुक गल्लीचा राजा, चौकाचा राजा, पेठेचा राजा अशा स्वरुपात मंडळांकडून गणेशमूर्तीची स्थापना होत आहे. त्यात पारंपरिक वाद्यांपेक्षा आमची साऊंड सिस्टीम कशी भारी आहे, हे दाखवण्याच्या इर्षेने तर नको असलेली स्पर्धा पहावयास मिळत आहे. पण या सर्व बाबीला फाटा देत जगात काहीही होवो, पण आम्ही आमची गणेशोत्सवाची चालत आलेली परंपरा कायम ठेवणार असल्याचे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या सोमवारपेठ गावाने दाखवून दिले आहे.
येथे 50 हून अधिक वर्षापासून गावात ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा आजही गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. पन्हाळगडाच्या पश्चिम पायथ्याशी असणारे सोमवारपेठ गाव. गावाची लोकसंख्या सहाशेच्या आसपास. पूर्वी सोमवारपेठ गाव पन्हाळा नगर परिषद हद्दीत येत होते. मात्र 1971च्या आसपास गावात सोमवारपेठ ग्रुप ग्रामपंचायतीची स्थापना झाली.
आज या गोष्टीला 50 हून अधिक वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. असे असले तरी गावात सुरुवातीपासूनच सर्व गावकरी एकत्रित येत ‘एक गाव एक गणपती’च्या संकल्पनेनुसारच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आले आहेत. 2002 मध्ये पन्हाळा पोलीस ठाण्याच्या सुचनेनुसार गावात विठ्ठल रखुमाई तरुण मंडळाची स्थापना करुन खऱ्या अर्थाने ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाला उत्साह आला.
ग्रामपंचायतीच्या प्रांगणात ‘श्री’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. सकाळी आणि सायंकाळी आरतीसाठी ग्रामस्थांची हजेरी लागत असते. आगमन मिरवणूक असो वा विसर्जन मिरवणूक असो, कधी साऊंड सिस्टीमचा वापर झालेला नाही. पारंपरिक वाद्यांच्या गजरातच मिरवणूक काढली जाते. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी गावासह पंचक्रोशीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
विशेष म्हणजे देणगीसाठी कुठल्याही प्रकारची सक्ती नाही. ऐच्छिक देणगी स्वीकारली जाते. गावात ज्या मुलीचे लग्न झाले असेल तर तिच्याकडून श्रींची मूर्ती देण्यात येत असते. गणेश विसर्जन मिरवणुकीदिवशी गावातील प्रत्येक घरातून आपल्या लाडक्या बाप्पाला ओवाळणी करुन निरोप दिला जातो. गावाच्या काही अंतरावर असलेल्या विहिरीत गणपतीचे विसर्जन केले जाते.
सर्व भेदभाव विसरुन 10 दिवस सोमवारपेठेत एकदिलाने गणेशोत्सव साजरा होत असल्याने या गावाचा आदर्श इतरांनीही घेणे गरजेचे आहे.
एक गाव एक गणपतीची परंपरा पुढे कायम ठेवणार
दरम्यान ही एक गाव एक गणपतीची परंपरा अशी पुढे कायम ठेवणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष राजु बुराण, माजी उपसरपंच वसिम देसाई, राकेश सावंत यांनी ‘तरुण भारत संवाद’ला सांगितले.








