26 तासांच्या मिरवणुकीत 173 मंडळांच्या श्रींचे विसर्जन : दीड लाखांहून अधिक गणेश भक्तांची हजेरी
गाण्यांच्या तालावर तरुणांनी धरला ठेका : भव्य गणेश मूर्ती आणि स्वागत कमानी मिरवणुकीचे खास आकर्षण
नियोजनबध्द बंदोबस्तामुळे विसर्जन निर्विघ्न, पोलिसांचाही जल्लोष
प्रतिनिधी/मिरज
सलग दोन वर्षांचे कोरोनाचे संकट झुगारुन मिरजकरांनी अलोट उत्साह आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. शुक्रवारी दिवसभर ‘गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषाने शहर दणाणून गेले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दीड लाखाहून अधिक भाविकांनी मिरवणुकीला हजेरी लावली होती. भव्य स्वागत कमानी, सजावटीसह आकर्षक गणेश मूर्ती आणि ध्वनीक्षेपकाच्या तालावरील बेधुंद होऊन नाचणारी तरुणाई ही मिरवणुकीचे खास वैशिष्टय़ होती. नियोजनबध्द बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार न होता 26 तासानंतर या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱयांनीही ध्वनीक्षेपकावर ठेका धरला.
शहरात 350 हून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. यापैकी शहर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात 295 तर, गांधी चौकी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात 100 हून अधिक मंडळांचा समावेश होता. पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी 180 हून अधिक मंडळांच्या श्रींचे विजर्सन झाले होते. अनंत चतुर्दशी दिवशी 173 मंडळांनी आपल्या श्रींचे विसर्जन केले. सकाळी नदीवेस येथील श्री शिवाजी गणेश मंडळाच्या बाप्पांचे पहिले विसर्जन झाले. सायंकाळी सहानंतर मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी 173 हून अधिक मंडळांचा मिरवणुकीत समावेश होता. विसर्जन मार्गावर आकर्षक गणेश मूर्ती, भव्य स्वागत कमानी, पावसाची अधून-मधून रिमझीम अशा वातावरणात ध्वनीक्षेपकाच्या दणदणाट करत हजारो तरुणांनी ठेका धरला होता. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरयाच्या जयघोषात गणेश तलाव येथे सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाला जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.








