टाळ, मृदंग, बहुतांशी ठिकाणी ढोल, ताशासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांचे आगमन
वार्ताहर /किणये
विघ्नहर्त्या गणरायाचे तालुक्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले. बुधवारी सकाळपासूनच घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी लगबग दिसून आली. मूर्ती आणताना भक्तांमध्ये उत्साह दिसून आला. तालुक्यात सर्वत्र एक नवचैतन्य निर्माण झाले होते. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष करत मूर्ती आणताना भक्त दिसत होते. फटाक्यांची आतषबाजी करत, पारंपरिक व ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. सकाळी घरगुती मूर्ती आणण्यात आल्या. दुपारनंतर विविध गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रीमूर्ती आणण्यास प्रारंभ झाला. सायंकाळी तालुक्याच्या काही भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू होती तरीही भक्तांमध्ये उत्साह दिसून आला.
तालुक्यात भगवेमय वातावरण
अलीकडे तरुणांमध्ये डॉल्बी व डीजेचे फॅड अधिक प्रमाणात निर्माण झाले आहे. अशी परिस्थिती असनाही तालुक्याच्या विविध गावांमध्ये टाळ मृदंगाच्या गजरात व बहुतांशी ठिकाणी ढोल, ताशा व पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाची मिरवणूक काढली. मिरवणुकीत भक्तांनी भगव्या टोप्या घातल्यामुळे वातावरण भगवेमय झाले होते.
घरोघरी आकर्षक सजावट
सकाळी दुचाकी, कारचाकी, टेम्पो आदी वाहनातून भाविक गणेशमूर्ती आणत होते. मूर्तीकारांनी यंदा विविध आकर्षक गणेशमूर्ती बनवल्या आहेत. काहीजण चालत डोक्यावरून गणपती बाप्पाला आणत होते. घरगुती मूर्तीसाठी भक्तांनी आपापल्या घरांमध्ये आकर्षक सजावट केली आहे. घरगुती गणेशमूर्तींचे महिला आरती करून स्वागत करतानाचे चित्र पहावयास मिळाले. पूजा चर्चा करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर पुरणपोळी व मोदक असा गोड नैवेद्य करण्यात आला.
विविध ठिकाणी हालते देखावे सादर
तालुक्याच्या गणेशोत्सव मंडळातर्फे गेल्या पंधरा दिवसापासून गणेशोत्सवाची तयारी करण्यात आली होती. विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारे हालते देखावे सादर करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मंडपाच्या सजावटीमध्ये मग्न झालेले पहावयास मिळाले.
दुपारी मंडळांच्या मिरवणुकीला प्रारंभ
बुधवारी दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. लाडक्या बाप्पाचे गावात जल्लोषांमध्ये स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिला आरती ओवाळून या मिरवणुकीचे स्वागत करत होत्या सायंकाळी गणेशाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली व महाआरती केली. येणाऱ्या अकरा दिवसांमध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या आहेत. तालुक्याच्या बहाद्दरवाडी, बेळगुंदी, जानेवाडी, बाळगमट्टी आदी गावांमध्ये यंदाही ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. बेळगुंदी गावात गणरायाच्या आगमन सोहळ्याची मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढली.









