ज्ञानेश्वरीच्या सुरवातीला गणेश वंदना करताना माउली म्हणतात, संपूर्ण वेदराशींनी युक्त असा देखणा वेष बाप्पांनी घेतलाय. वेदांप्रमाणेच त्यांची काया निर्दोष आहे. अठरा पुराणे हे त्यांचे रत्नजडित अलंकार आहेत. पुराणातील काव्यातील विविध अलंकार हे फारच मुलायम आहेत.
रामायण आणि महाभारत ही काव्ये त्यांच्या पायात रुणझुणत्या घाग्dरया होऊन बसलेली आहेत. ही महाकाव्ये रचणाऱ्या वाल्मिकी व व्यास यांच्या नवनवोन्मेषशालिनी बुद्धीचा शेला बाप्पांनी कंबरेला बांधलेला आहे. सहा शास्त्रांनी त्यांचे हात तयार झाले आहेत. माउली पुढे म्हणतात, श्रीगणेशाची सोंड म्हणजे महासुखाचा परमानंद कल्लोळ आहे. ती सरळ असून शुभ काय, अशुभ काय हे ती सहजी ठरवू शकते. श्रीगणेशाच्या दुसऱ्या दाताबद्दल माऊली सांगत आहेत. ते म्हणाले, प्रश्नोत्तररुपी तात्विक चर्चा ही आपल्या शास्त्रांचे प्रमुख अंग आहे. ही चर्चा तात्विक असल्याने त्यात वादविवादाला स्थान नाही. ह्या तात्विक निर्विवाद चर्चेचे प्रतीक म्हणून श्रीगणेशाचा दुसरा दात सरळ आहे. चर्चा तत्वावर आधारित असल्याने त्यात एकमेकांना दूषणे देणे, अपमान करणे इत्यादींचा समावेश नसल्याने त्यात काहीही काळेबेरे नसते. माझंच बरोबर अशी आग्रही वृत्तीही नसते. म्हणून श्रीगणेशाचा सरळ असलेला दात पांढरा शुभ्र आहे.
श्रीगणेशाच्या छोट्याशा डोळ्यांबद्दल सांगताना माउली म्हणतायत, या देवाचे ज्ञानरुपी डोळे जरी छोटेसे असले तरी विघ्ने निर्माण करणाऱ्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत व त्यांना योग्यवेळी शासन करण्यास सज्ज आहेत. मीमांसा शास्त्रातील पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा या दोन्ही गणेशाच्या कानांचे ठिकाणी असून बोध हे त्याखालून झरणारे अमृत असून मननशील महात्मे भुंगे होऊन ते सेवन करत आहेत. पाणिनीच्या व्याकरणाप्रमाणे मीमांसा करणे म्हणजे तर्कशुद्ध विचार करणे होय. वेदांचे मुख्यत: धार्मिक कर्म आणि तत्त्वज्ञान हे दोन विषय आहेत. धार्मिक कर्म हा विषय वेदांच्या पूर्व भागामध्ये प्रतिपादिला आहे त्याची मीमांसा ज्या भागात केली आहे, त्यास पूर्वमीमांसा म्हणतात आणि वेदांच्या उत्तर भागात धार्मिक तत्त्वज्ञान प्रतिपादिले आहे. पूर्व भाग फार मोठा आहे आणि उत्तर भाग छोटा आहे. या छोट्या भागास वेदान्त किंवा उपनिषद म्हणतात. आपले वेद, शास्त्र, पुराणे हे सनातन साहित्य स्मृती आणि श्रुती या दोन पद्धतीने पूर्वापार जतन करण्यात आलेले आहे. श्रुती म्हणजे एकाकडून दुसऱ्याने ऐकायचे व लक्षात ठेवायचे तर स्मृती म्हणजे स्मृतीत ठेवलेले म्हणजे पाठ करून आठवणीत ठेवलेले. श्रुती आणि स्मृतीत वरील ग्रंथांची तत्वे जतन केलेली आहेत
श्रुतीस्मृतीमध्ये चर्चा केलेल्या तत्वांचे प्रतीक म्हणून गणेशाच्या अंगावरील पोवळ्यांकडे पाहता येईल तर श्रीगणेशाची तुल्यबळ गंडस्थळे म्हणजे द्वैत आणि अद्वैत ही तत्वज्ञाने होत. उपनिषदे म्हणजे ज्ञानरुपी मधाचा ठेवाच होत. ही उपनिषदे श्रीगणेशाच्या मुकुटावर फुलांच्या रुपात शोभून दिसत आहेत.
ओंकाराची प्रथम मात्रा आकार ते म्हणजे श्रीगणेशाचे पाय, द्वितीय मात्रा उकार ते याचे विशाल उदर तर तृतीय मात्रा मकार हा याचा भव्य वर्तुळाकृती मस्तकाकार होय. या तिन्ही मात्रा जिथे एकवटतात तेथे शब्दब्रह्मरुप वेद कवेत मावण्याजोगा होतो. अशा ह्या आदीबीज ओंकाररूपी गणपतीला श्रीगुरूंच्या कृपेने मी नमस्कार करत आहे.
क्रमश:








