वार्ताहर /नंदगड
नंदगड येथे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा गेल्या 80 वर्षांपासून सुरू आहे. वेगवेगळ्या रूपातील गणेशमूर्ती आणली जाते. यावर्षी या गणेश मंडळाने मोठ्या कान पाटलाची आठ फुटाची गणेशमूर्ती साकारली आहे. त्यामुळे गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी नंदगडसह परिसरातील अनेक भाविक पहिल्या दिवसापासूनच गर्दी करत आहेत. नंदगड येथील बाजारपेठेत संपूर्ण गावातर्फे एकाच ठिकाणी एकच सार्वजनिक गणेशमूर्ती आणली जाते. दरवर्षी वेगवेगळ्या रूपातील मूर्ती साकारण्याची परंपरा येथे आहे.
नंदगड येथे अनेक गणेश
मूर्तिकार आहेत. त्यापैकीच एकाने सार्वजनिक गणेश मूर्ती साकारली आहे. नंदगड येथील कुंभार गल्लीतून गणेश चतुर्थी दिवशी शनिवार 7 रोजी सायंकाळी पाच वा. सार्वजनिक गणेशमूर्ती मिरवणुकीला सुऊवात झाली. मठ गल्ली, कलाल गल्ली, बाजारपेठमार्गे सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी मूर्ती ट्रकमधून आणण्यात आली. नियोजित स्थळी रात्री नऊ वाजता श्री गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी आबालवृद्धांसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.









