समुद्रात बुडाल्यावर 36 तासांपर्यंत मूर्तीला पकडून राहिला जिवंत : गुजरातमधील घटना
वृत्तसंस्था/ सूरत
गुजरातच्या सूरत शहरानजीक समुद्रात बुडणारा एक मुलगा आश्चर्यकारक पद्धतीने बचावला आहे. 36 तासांपर्यंत हा मुलगा गणेश मूर्तीच्या एका फ्रेमला पकडून तरंगत राहिला. अखेरीस मच्छिमारांची नजर त्याच्यावर पडली आणि त्याचा जीव वाचला आहे. या 14 वर्षीय मुलाचे नाव लाखन असून तो स्वत:ची आजी सविताबेन, भाऊ करन (11 वर्षे) आणि बहिण अंजली (10 वर्षे) यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी सूरतच्या डुमस बीचवर गेला होता. त्याचदरम्यान ही दुर्घटना घडली होती.
मुले स्वत:च्या आजीसोबत अंबाजी मंदिरात गेली होती, नंतर मुलांच्या हट्टामुळे आजी त्यांना डुमस बीचवर घेऊन गेली होती. बीचवर पोहोचल्यावर लाखन आणि करन हे समुद्रस्नान करू लागले. आजीने दटावल्यावर अंजली पाण्यातून बाहेर पडली. परंतु दोन्ही भाऊ स्नान करण्याच्या हट्टावर ठाम राहिले. याचदरम्यान समुद्रात मोठी लाट निर्माण होत दोन्ही भाऊ त्याच्या तडाख्यात सापडले. तेथे उपस्थित काही लोकांनी करनला लाटांपासून वाचवत बाहेर काढले, परंतु लाखन लाटांमध्ये हरवला.
यानंतर बचाव, अग्निशमन अन् पाणबुडे तसेच मच्छिमारांचे पथक या मुलाचा शोध घेत होते. शनिवारी संध्याकाळी उशिरा काही मच्छिमारांची नजर समुद्रात तरंगत असलेल्या मुलावर पडली. प्रथम त्यांना मुलाचा मृतदेह तरंगत असावा असे वाटले, परंतु मच्छिमार त्याच्यानजीक पोहोचल्यावर तो भगवान गणेशाच्या मूर्तीच्या फ्रेमला पकडून असल्याचे दिसून आले. मुलाची अवस्था बिकट असली तरीही त्याचा श्वास सुरू होता. मच्छिमारांनी कळविल्यावर बचाव अन् वैद्यकीय पथकाने तातडीने प्राथमिक उपचार करत त्याला रुग्णालयात दाखल करविले आहे.
जिवंत असल्याची सोडली होती आशा
बचाव पथकाने शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य चालविले, परंतु लाखनचा शोध लागला नव्हता. बचावपथकासोबत कुटुंबीयांनी देखील लाखन जिवंत असण्याची आशा सोडून दिली होती. भरतीदरम्यान समुद्रात निर्माण होणाऱ्या अजस्त्र लाटांदरम्यान कुठलाही व्यक्ती जिवंत राहणे अवघड असते. तर लाखन केवळ 14 वर्षांचा होता. आम्ही आमच्या मुलाला मृत मानून त्याचा मृतदेह स्वीकारण्यासाठी आलो होतो, परंतु देवाच्या कृपेने तो आम्हाला जिवंत सापडल्याचे लाखनच्या वडिलांनी म्हटले आहे.
तरंगत 22 किमीपर्यंत पोहोचला
नवसारी जिल्ह्यातील भट गावातील मच्छिमार रसिक टंडेल मागील 5 दिवसांपासून स्वत:च्या सहकाऱ्यांसोबत समुद्रात मासेमारी करत होते. रसिक हे स्वत:च्या नौकेतून शनिवारी दुपारी नवसारी किनाऱ्यापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर मच्छिमारी करत असताना त्यांना लाखन दिसून आला होता. रसिक यांनी नौका त्याच्यानजीक घेत समुद्रात उडी घेतली. लाखन हा गणेश मूर्तीच्या लाकडी फ्रेमला पकडून असल्याचे रसिक यांना दिसून आले. मच्छिमारांनी त्याला समुद्रातून बाहेर आणत वैद्यकीय पथकाच्या हवाली केले.
वैद्यकीय तपासणीनंतर कुटुंबाला भेटणार
मुलाला नवसारी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याला आयसीयूत ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्याच्या अनेक वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार आहेत. त्यानंतरच त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे डॉक्टर शालीन पारिख यांनी सांगितले आहे.









