शेवटच्या टप्प्यातील कामात अडथळ्यांमुळे मूर्तिकारांमध्ये नाराजी : रंगकामाची धांदल
बेळगाव : गणेशोत्सव अवघ्या पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने मूर्तिशाळांमध्ये लगबग सुरू आहे. सार्वजनिक गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. परंतु, या कामामध्ये वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यत्यय येत आहे. रंगकाम करताना विजेची गरज भासते. परंतु, त्यावेळीच वीज गायब होत असल्याने मूर्तिकार अडचणीत सापडले आहेत. बेळगाव शहर व परिसरात अनेक मूर्तिकार दरवर्षी मोठ्या सार्वजनिक मूर्ती साकारत असतात. बेळगावसह धारवाड, गदग, विजापूर, इचलकरंजी, गोवा येथून सार्वजनिक गणेशमूर्तींना मागणी असते. गणेशोत्सवापूर्वी दोन-तीन दिवस आधीच परगावच्या मूर्ती स्थानिक मंडळे घेऊन जातात. त्यामुळे मूर्तींवर रंगकाम करून त्या तयार ठेवण्याची जबाबदारी मूर्तिकारांवर असते. सध्या रंगकाम सुरू असून काही मूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. रंगकाम करण्यासाठी स्प्रे मशीनचा वापर केला जातो. या मशीनसाठी वीजपुरवठा सुरू असणे आवश्यक असते. परंतु, मागील पाच-सहा दिवसांपासून शहरात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. काही भागात हेस्कॉमकडून दुरुस्तीचे काम केले जात असल्याने वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. ऐन सणाच्या धामधुमीत हेस्कॉमकडून दुरुस्तीच्या नावाखाली वीज खंडित केली जात असल्याने व्यापार-उदिमाला फटका बसत आहे. वास्तविक हे काम पंधरा दिवसांपूर्वीच पूर्ण करणे गरजेचे होते.
तब्बल दहा तास वीज गायब
गुड्सशेड रोड परिसरात अनेक मूर्तिकारांच्या कार्यशाळा आहेत. या परिसरात बुधवारी पहाटे 6 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत वीजपुरवठा ठप्प होता. तब्बल दहा तास वीज नसल्यामुळे मूर्तिकारांचे हाल झाले. वीज नसल्यामुळे रंगकाम अर्धवट स्थितीत राहिल्याने मूर्तिकारांकडून नाराजीचा सूर ऐकायला मिळाला. गणेशमूर्ती पूर्ण करण्यासाठी मूर्तिकारांना आता तारेवरची कसरत करावी लागत आहे.
हेस्कॉमकडून सुरळीत वीजपुरवठ्याची गरज
गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात आहे. रंगकामासाठी विजेची आवश्यकता असते. परंतु, मागील चार दिवसांत विजेचा खेळखंडोबा सुरू असल्याने रंगकाम थांबले आहे. गणेशमूर्ती तयार करून देण्यासाठी मोजकेच दिवस असल्याने हेस्कॉमने सुरळीत वीजपुरवठा करण्याची गरज आहे.
– अमित कुंभार (मूर्तिकार)









