वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, यमनापूर, गौंडवाड परिसरामध्ये बुधवारी बँड ताशाच्या निनादात, फटाक्याच्या आतषबाजीमध्ये भक्तिपूर्ण व मोठ्या उत्साही वातावरणात घरोघरी गणरायांचे आगमन झाले. बुधवारी सकाळी 8 वाजल्यापासूनच परिसरात भाविक घरगुती गणपती आणायला सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत होते. सकाळी 8 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत गणपती आणत होते. यामध्ये कुणी डोक्यावरुन, दुचाकी, रिक्षा, ट्रॅक्टरद्वारे गणपती मूर्ती आणत होते.
डीजेला फाटा देवून सार्वजनिक गणपतींचे आगमन
कंग्राळी बुद्रुक गावातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी शांतता बैठकीची दखल घेवून सायंकाळी 7 ते 10 पर्यंत डीजेला फाटा देवून पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणपतीची मूर्ती आणली. रात्री नैवैद्य दाखवून भक्तिमय वातावरणामध्ये सार्वजनिक गणपतींचे पूजन केले.









