पुढच्या वर्षी लवकर या…च्या घोषणांनी गणरायाला निरोप
खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गणरायांचे शनिवारी भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. घरगुती गणपतींचे दुपारी 2 नंतरच विसर्जनास सुरुवात झाली. रात्री उशीरापर्यंत घरगुती गणपतींचे विसर्जन मलप्रभा नदीघाटावर करण्यात आले. तर ग्रामीण भागात नदी, तलाव, ओढ्यात आणि विहिरीत विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक गणपतींचे विसर्जन रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत सुरू होते. नगरपंचायतीने सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनासाठी ब्रिज कम बंधाऱ्यावर क्रेनची व्यवस्था केल्याने सार्वजनिक गणपतींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडले. शनिवारी दुपारनंतर मलप्रभा नदीकाठावर घरगुती गणपतींच्या विसर्जनास सुरुवात झाली.
शहरासह विद्यानगर, शिवाजीनगर, हलकर्णी, दुर्गानगर, गुरुकुल कॉलनी, हिंदूनगर यासह शहरातील सर्व गल्ल्यांतून घरगुती गणपती डोक्यावरुन, चारचाकी वाहनातून आणण्यात येत होत्या. फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांच्या गजरात तसेच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… गणपतीच्या जय जय कार…च्या घोषणा देत, गणपती विसर्जन मलप्रभा नदीघाटावर करण्यात आले. शेवटची पूजाविधी आणि आरतीनंतर गणपतींचे विसर्जन करण्यात येत होते. विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नगरपंचायतीने खास व्यवस्था केली होती. घाटावर प्रकाश योजना, क्रेनची व्यवस्थाही केली होती. नगरपंचायतीचे कर्मचारी आणि बचाव पथकही तैनात केले होते.गणपती विसर्जन पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक लालसाब गवंडी, पोलीस उपनिरीक्षकासह मोठ्या फौजफाटा तैनात केला होता.
नंदगड येथील गणपतींचे विसर्जन 
नंदगड येथे एक गाव एक गणपतीची परंपरा गेल्या 82 वर्षापासून सुरू आहे. यावर्षीही मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. शनिवारी सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.









