शेतकऱ्यांचे फलकाद्वारे आवाहन
बेळगाव : वडगाव येथील मंगाईनगरच्या हनुमान तलावामध्ये भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन परिसरातील शेतकऱ्यांनी केले आहे. सध्या या तलावातील पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरले जात असल्याने कोणीही विसर्जन करू नये, अशी सूचना करणारे फलक सध्या शेतकऱ्यांकडून लावण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मंगाईनगर येथील मंगाई तलाव व हनुमान तलावाचा विकास करण्यात आला. परिसरात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा तलाव महत्त्वाचा आहे. या तलावात जर गणेशमूर्ती विसर्जन केल्यास रासायनिक रंगांमुळे पाणी दूषित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फटका जनावरांना बसणार असून कोणीही मूर्ती विसर्जित करू नये. त्याऐवजी नाझर कॅम्प येथे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन तलावामध्ये विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी हणमंत बाळेकुंद्री, राजू जुवेकर, बंटी सायनेकर, सुशांत तरळेकर, बाळू कित्तूरकर यासह शेतकरी उपस्थित होते.









