दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती
पणजी : काही पंचांगांची गणित पद्धती भिन्न असल्यामुळे वर्षभरातील काही सणवारांमध्ये एक दिवसाचा फरक येत असतो आणि अशा वेळेस सणाच्या काही दिवस आधी लोकांमध्ये सण-उत्सव याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. ते म्हणाले, धर्मसिंधु या ग्रंथात दिलेला गणेशचतुर्थी निर्णय म्हणजे ‘पूर्वदिने एकदेशेनमध्याह्रव्यापिनी परदिने संपूर्ण मध्याहनव्यापिनी तदा परैव । तथा भौमवार योग प्रशस्ता…’ (धर्मसिंधु, गणेश चतुर्थी निर्णय) असा आहे. 18 सप्टेंबर रोजी तृतीया समाप्ती दुपारी 12.40 वा. असून दुसऱ्या दिवशी चतुर्थी समाप्ती दुपारी 13.45 वा. आहे. वरील शास्त्राrय वचनाप्रमाणे 19 सप्टेंबर 2023 रोजी चतुर्थी संपूर्ण मध्याहनव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्रीगणेश चतुर्थी योग्यच आहे. (यापूर्वी 26-08-1998 रोजी अशीच परिस्थिती असताना याच पद्धतीने निर्णय केलेला होता.)
श्रृंगेरीच्या पू. शंकराचार्यांनी प्रत्यक्ष भेटीत आणि पू. गणेश्वर द्रविडशास्त्राr यांनी डोंबिवली येथील सभेत मत मांडताना पंचांग विषयक मतमतांतरे राहणार आहेत, म्हणून आपण जे पंचांग नेहमी वापरत आहात त्याप्रमाणे आचरण करावे असे सांगितलेले आहे. आपण दाते पंचांग गेली अनेक वर्षे वापरत आहात तेव्हा अचूक गणित आणि धर्मशास्त्राrय निर्णय असलेल्या दाते पंचांगाप्रमाणे कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, तसेच इतर अनेक कॅलेंडर्स, भारत सरकारचे राष्ट्रीय पंचांग, श्रीस्वामी समर्थ पंचांग, निर्णय सागर, राजंदेकर पंचांग आदी पंचांगांमध्ये दिल्याप्रमाणे मंगळवारी 19 सप्टेंबर रोजी अंगारक योगावर गणपती स्थापना करणे योग्य होईल. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आदी प्रदेशात सर्वत्र 19 सप्टेंबर रोजी मंगळवारी श्रीगणेश चतुर्थी आहे, अशी माहिती मोहन दाते यांनी दिली.









